पंकजा मुंडेंच्या राजकीय भूमिकेवर सस्पेन्स; फेसबुकवर पुन्हा आलं कमळ!

टीम ई-सकाळ
Tuesday, 3 December 2019

येत्या  12 डिसेंबरला गोपिनाथ मुंडे यांच्या जयंतीदिवशी गोपीनाथ गडावरच पंकजा मुंडे भूमिका स्पष्ट करणार आहेत.

पुणे : भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या राजकीय भूमिकेविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. पंकजा मुंडे भाजपला जय श्रीराम करून शिवसेना किंवा राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा दोन दिवसांपासून सुरू आहे. पंकजा मुंडे यांनी तीन दिवसांपूर्वी फेसबुकवर एक पोस्ट करून वेगळ्या निर्णयाचे संकेत दिले होते. त्यानंतर या चर्चेला सुरुवात झाली. पुढं त्यांनी आपल्या ट्विटर प्रोफाईलवरून भाजप हा शब्द हटविला होता. पण, आज त्यांच्या फेसबुकवर पुन्हा कमळं दिसलंय. दरम्यान, भाजपकडून पंकजा मुंडे यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. 

डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

काय घडलं?
पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांमुळेच हा पराभव झाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळं नाराज पंकजा मुंडे पक्षाला राम राम करणार असल्याची चर्चा सुरू झाली. येत्या  12 डिसेंबरला गोपिनाथ मुंडे यांच्या जयंतीदिवशी गोपीनाथ गडावरच त्या भूमिका स्पष्ट करणार आहेत. पण, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्या शिवसनेच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. तसचं त्या राष्ट्रीय समाज पक्षातही प्रवेश करण्याची शक्यता असल्याचीही चर्चा आहे.

आणखी वाचा - मेट्रो कारशेडच्या विषयावर यू-टर्न नको; मनसेची अपेक्षा

पुन्हा कमळ
काल, पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून भाजप शब्द हटविला होता. त्यामुळं त्या भाजप सोडणार हे निश्चित मानलं जात असताना आज, फेसबुकवरील त्यांच्या एका पोस्टवर पुन्हा भाजपचं कमळ दिसलंय. त्यामुळं पंकजा मुंडे यांच्या मनात नेमकं काय चाललंय, हे अद्याप स्पष्ट होत नाहीय. 

आणखी वाचा - पंकजा मुंडेंच्या पराभवावर एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा

कोणी घेतली पंकजा मुंडे यांची भेट?
भाजपचे जालन्यातील नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज, पंकजा मुंडे यांची भेट घेतली. या भेटीत काय चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, भाजपकडून पंकजा मुंडे यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जाते. काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील पंकजा आमच्या सोबतच आहेत, असा खुलासा केला होता. पंकजा मुंडे यांनी मात्र, यावर कोणतिही प्रतिक्रिया दिलेली नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp leader pankaja munde to quit from party speculations and suspence