Raj Thackeray यांच्यासोबत भाजप नेत्यांच्या भेटीगाठी का वाढल्या?

राज ठाकरे आणि भाजप इतकं जवळ का येतंय?
Devendra Fadanvis and Raj Thackeray
Devendra Fadanvis and Raj Thackerayesakal

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भाजप नेत्यांशी जवळीक दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. म्हणजे राज ठाकरे शिवतीर्थ या आपल्या नव्या निवासस्थानी राहायला गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, अगदी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, त्यानंतर आता नवनिर्वाचित भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी राज ठाकरेंची आज सदिच्छा भेट घेतल्याचं म्हटलंय. हिंदुत्वाची बाजू राज ठाकरे मांडत आलेत. महाराष्ट्रात हिंदुत्वाचं रक्षण करताहेत, त्यामुळे त्यांना भेटल्याचं बावनकुळेंनी सांगितलं.

राज ठाकरे आणि भाजप इतकं जवळ का येतंय?

तर, राज ठाकरेंनी घेतलेली हिंदुत्वाची भूमिका ही त्याला कारणीभूत असल्याचं कळतंय. जून महिन्यात राज ठाकरे अयोध्येचा दौरा करणार होते. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे राज ठाकरेंचा अयोध्या दौरा लांबणीवर पडला. त्यानंतर राज ठाकरेंनी भोंग्याचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी त्यांनी भोंग्याचा विषय हा राजकारणाचा नसून सामाजिक मुद्दा आहे, असं म्हणत तत्कालीन महाविकासआघाडी सरकारला सर्व मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा इशारा दिला. जर भोंगे उतरले नाहीत तर मनसैनिकांना मशिदीसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावण्याचे आदेश दिले.

तर तिकडे मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा देणाऱ्या राणा दाम्पत्याला तुरुंगात डांबण्यात आलं. त्या कारवाईचा समाचार घेताना राज ठाकरेंनी आपले चुलत बंधू आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही खडेबोल सुनावले. याच काळात त्यांनी पुण्यात जाऊन हनुमान आरती केली. आणि आता गणेशोत्सव काळात हिंदुत्वाची भूमिका लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी मनसेकडून हनुमान चालिसा पुस्तिकेचं वाटप मुंबईकरांना करण्यात येतंय. गणेशोत्सवानिमित्त सिद्धीविनायक मंदिराबाहेर हनुमान आणि गणेश आरती पुस्तिकेचं वाटप सुरु करण्यात आलंय.

Devendra Fadanvis and Raj Thackeray
Kashmir: काँग्रेसला धक्यावर धक्के: आझाद यांच्या समर्थनासाठी 51 नेते देणार राजीनामा

एका वाहिनीच्या कार्यक्रमात नुपूर शर्मानं केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे मुस्लिम देशांनी भारताविरोधात भूमिका घेतली. त्यानंतर नुपूर शर्मांवर पक्षानं कारवाई केली, यावेळी नुपूर शर्मांच्या विधानाचं समर्थन करतानाच राज ठाकरेंनी ओवैसी बंधूंच्या बेताल वक्तव्याची राजकारण्यांना आठवण करुन दिली. त्यामुळे राज ठाकरेंनी बाळासाहेबांनी घेतलेल्या प्रादेशिक अस्मितेसोबतच आता हिंदुत्वाच्या भूमिकेशीही आपली गाठ बांधली आणि आता पुन्हा मनसेच्या संघटनात्मक वाढीच्या दिशेनं पाऊल टाकलंय.

२५ ऑगस्टला मनसे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना संबोधतानाही राज ठाकरेंनी वारसा हा वस्तूंचा नाही तर विचारांचा असतो आणि तो पुढे चालवायचा असतो. आणि माझ्याकडे आजोबा प्रबोधनकार ठाकरे आणि काका बाळासाहेबांचा विचार असून तो मला पुढे न्यायचा आहे, अशा शब्दात आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणावर बोलणं टाळलं होतं पण निवडणूक चिन्हावरुन मात्र शिवसेना आणि शिंदे गटालाही खोचक टोला लगावला होता.

Devendra Fadanvis and Raj Thackeray
Anna Hazare : जशी दारूची नशा असते, तशीच सत्तेचीही नशा असते; अण्णा हजारेंनी केजरीवालांना फटकारलं

अशातच राज ठाकरेंनी घेतलेल्या हिंदुत्वाच्या भूमिकेनंतर भाजप नेत्यांकडून त्यांच्या भूमिकेचं स्वागतच केलं जातंय. शिवसेना बाळासाहेबांचं हिंदुत्व विसरली आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसल्याचा आरोप हा भाजपसह शिंदे गट, मनसेकडूनही करण्यात येतोय. तर तिकडे राज ठाकरेंचा उल्लेख मनसे कार्यकर्ते हिंदूजननायक असं करताना दिसले. याशिवाय पुण्यात मनसेच्या सदस्य नोंदणीला सुरुवात झाली त्यावेळीही मनसेनं ‘मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक’ अशा आशयाचे बॅनर लावले. त्यामुळे मनसेच्या बदललेल्या हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे भाजप आणि मनसेची जवळीक वाढल्याची चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com