गडकरींच्या गावात भाजपचा दारुण पराभव

BJP Losses Grampanchayat Election in Gadkaris village
BJP Losses Grampanchayat Election in Gadkaris village

नागपूर- केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे जन्मगाव असलेल्या धापेवाडा (ता. कळमेश्‍वर) ग्रामपंचायतीमध्ये भाजपचा अक्षरशः सुपडासाफ झाला. या गावातील निवडणुकीत सरपंच म्हणून कॉंग्रेसचे सुरेश डोंगरे निवडून आले असून 17 सदस्यांच्या या ग्रामपंचायतमध्ये कॉंग्रेसचे 16 सदस्य निवडून आले आहेत. आमदार सुनील केदार यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांना गावातच चीत केल्याचे बोलले जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दत्तक घेतलेल्या पाचगावमध्येही भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले.

नागपूर जिल्ह्यातील कळमेश्‍वर तालुक्‍यातील धापेवाडा तीर्थस्थळ म्हणूनही प्रसिद्ध आहे. हे गाव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मूळ गाव असून या गावात अद्यापही गडकरींचा वाडा आहे. या गावातील ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा निकाल महत्त्वपूर्ण आहे. या गावातील निवडणुकीची जबाबदारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नागपूर जिल्हा भाजपचे अध्यक्ष राजीव पोद्दार, गडकरींचे समर्थक रमेश मानकर यांच्यावर टाकली होती. रमेश मानकर व राजीव पोद्दार यांनी पूर्णवेळ दिल्यानंतरही भाजपला पराभवाला सामोरे जावे लागल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

कॉंग्रेसकडून आमदार सुनील केदार व नागपूर जिल्हा परिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते मनोहर कुंभारे यांनी ही बाजू पार पाडली. या विजयाबद्दल बोलताना आमदार सुनील केदार सकाळशी बोलताना म्हणाले, नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या खोट्या आश्‍वासनाचा परिणाम आहे. ग्रामीण भागातील लोकांना आता कर्जमाफी, शेतमालांना भाव न मिळाल्याने पसरलेला असंतोष या निवडणुकीत बाहेर आला आहे. कॉंग्रेसच्या सामान्य व निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विजय असल्याचे आमदार केदार यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उमरेड तालुक्‍यातील पाचगावला खासदार दत्तक गाव म्हणून विकास केला आहे. पाचगाव हे जिल्ह्यातील पहिले डीजीटल ग्रामपंचायत म्हणून प्रसिद्ध आहे. या गावात बराच विकास केल्याचा दावा केला जात होता. परंतु ग्रामपंचायतच्या निवडणुकीत मात्र लोकांनी कॉंग्रेसच्या बाजूने माप टाकले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com