esakal | चिपी विमानतळाचं श्रेय आघाडीचं भाजपनं दिशाभूल करु नये - राष्ट्रवादी
sakal

बोलून बातमी शोधा

Sindhudurg Chipi Airport

चिपी विमानतळाचं श्रेय आघाडीचं भाजपनं दिशाभूल करु नये - राष्ट्रवादी

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे नुकतीच जाहीर केली. राज्य सरकारला डावलून केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडणार असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. राणेंनी भाजपला याचं श्रेय देण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनं यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. चिपी विमानतळाचं श्रेय आघाडी सरकारचं असून भाजपनं याच श्रेय लाटण्याचा प्रयत्न करुन जनतेची दिशाभूल करु नये असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

मलिक म्हणाले, "राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचं आघाडी सरकार होतं तेव्हा चिपी विमानतळाला मंजुरी देण्यात आली. यानंतर एमआयडीसीच्या माध्यमातून या विमानतळाच्या कामाची सुरुवात झाली. भाजप तेव्हा महाराष्ट्रातच काय देशातही सत्तेत नव्हतं. तेव्हा आघाडी सरकारच्या माध्यमातून याबाबत निर्णय घेण्यात आला. आता याचं काम पूर्ण झालेलं असताना राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. पण भाजपमुळं हे विमानतळ झालं आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न करत जनतेची दिशाभूल करण्याचं काम भाजपचं कडून सुरु आहे"

हेही वाचा: कोरोनानं झालेल्या मृत्यूंसाठी SCनं नाकारली नुकसान भरपाई; म्हटलं...

"आता राणे भाजपमध्ये गेले असतील पण ते काँग्रेसमध्ये असताना त्यावेळी आघाडीच्या सरकारनं या विमानतळाला कॅबिनेटमध्ये मंजुरी दिली होती. तसेच त्यांच्या कामासाठी निधीही उपलब्ध करुन दिला होता. त्यामुळं या कामात भाजपची कुठलीही भूमिका राहिलेली नाही," असंही मलिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

नारायण राणेंनी केली होती घोषणा

चिपी विमानतळाचं बांधकाम पूर्ण झाल्यानं याचं उद्घाटनं ९ ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात येईल अशी घोषणा नारायण राणे यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते या विमानाचं उद्घाटनं केलं जाईल, असंही त्यांनी जाहीर केलं होतं. ९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता चिपी विमानतळावरुन विमानांची वाहतूक सुरु होईल, असंही राणे यांनी म्हटलं होतं.

loading image
go to top