
काही जणांना राजकारणात योग्य ते स्थान मिळालं नसल्यानं हे षडयंत्र केलं जातंय
भाजप आमदार नाईक अज्ञातवासातून बाहेर; गुन्हा दाखल झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया
मागील काही दिवसांपासून भाजपाचे आमदार गणेश नाईक यांच्यावर एका महिलेकडून गंभीर आरोप करण्यात आले होते. बलात्काराच्या आरोपामुळे गोत्यात आलेले भाजपचे नेते गणेश नाईक गायब झाले होते. अखेर आमदार नाईक आता अज्ञातवासातून बाहेर पडले आहेत. गुन्हे दाखल झाल्यानंतर प्रथमच नाईक जाहीररीत्या बाहेर पडले असून त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. काही जणांना राजकारणात योग्य ते स्थान मिळालं नसल्यानं हे षडयंत्र केलं जात आहे, अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे.
नाईक म्हणाले, हे विरोधी राजकीय पक्षांनी केलेल षडयंत्र आहे. बलात्कार, जीवे ठार मारण्याचे गुन्हे माझ्यावर दाखल झाले आहेत, हे सगळं षडयंत्र असल्याचा हल्लाबोल केला आहे. 'न्यायालयाने मला सूट दिली आहे पण काही अटी टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात मी माझ्यावर लावण्यात आलेल्या गुन्ह्यांवर सविस्तर बोलणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यानंतर गणेश नाईक हे प्रथमच मनपा आयुक्तांच्या भेटीला आले होते. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा: भुजबळ म्हणाले, तीन पक्षाचं सरकार असल्यानं थोड घर्षण होणारच
दरम्यान, जीवे ठार मारण्याची धमकी आणि बलात्काराच्या आरोपात गणेश नाईक यांना 4 मे रोजी मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला. 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर नाईकांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. एका महिलेने बलात्कार आणि फसवणुकीचे आरोप केल्यानंतर गणेश नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात ठाणे न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर गणेश नाईक यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. यानंतर गणेश नाईक यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. तिथे त्यांना दिलासा मिळाला.
काय आहे नेमकं प्रकरण?
गणेश नाईक यांच्यासोबत प्रेमसंबंध असणाऱ्या एका महिलेने तब्बल 27 वर्षांनी त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. याबाबत नेरुळ पोलीस ठाण्यात कलम 376 अन्वये गुन्हा दाखल आहे. तर रिव्हॉल्व्हर दाखवून धमकावल्याप्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यातही नाईक यांच्याविरुद्ध याच महिलेने स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. नेरुळच्या गुन्ह्यासंदर्भात अनेकदा आपल्या इच्छेविरोधात शरीरसंबंध ठेवले गेल्याचं या महिलेने तक्रारीमध्ये म्हटलं आहे. नवी मुंबई पोलिसांनी पुरावे गोळा करण्यासही सुरुवात करुन या महिलेची वैद्यकीय चाचणीही केली.
हेही वाचा: इंदुरीकर महाराज पुन्हा गोत्यात? वादग्रस्त वक्तव्यामुळे गुन्हा दाखल होण्याची शक्यता
Web Title: Bjp Mla Ganesh Naik Statement On First Time Criticized To Opposition
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..