शिवसेना भाजपची युती 'कासव' गतीने : उद्धव ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 12 एप्रिल 2017

शिवसेना रस्त्यावर उतरून विरोध करते, तेव्हा आमच्यावर टीका होते. पण अशा काही घटना झाल्यावरच लोकांचे देशप्रेम जागे होते. 
- उद्धव ठाकरे 

मुंबई : 'भाजप-शिवसेनेची युती सध्या 'कासव'गतीने सुरू आहे,' अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (बुधवार) युतीतील तणावाबद्दल सूचक विधान केले. विशेष म्हणजे, '2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच उमेदवार असतील,' या प्रस्तावास शिवसेने नुकताच होकार दिला आहे. 

राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये बाजी मारणाऱ्या 'कासव' आणि 'व्हेंटिलेटर' या दोन मराठी चित्रपटांच्या कलाकारांचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 'व्हेंटिलेटर'वर असलेल्या भाजप-शिवसेना युतीचे काय होणार?' असा प्रश्‍न उद्धव यांना यावेळी विचारण्यात आला. त्यावर त्यांनी हे उत्तर दिले. उद्धव यांच्या विधानाबद्दल वेगवेगळे तर्क लढविले जात आहेत. 

उद्धव ठाकरे म्हणाले, 'मराठी कलाकारांचा मला अभिमान वाटतो. या कलाकारांचे जगात कौतुक होत आहे. पण घरातही त्यांचे कौतुक करणे आवश्‍यक आहे.'' मराठी चित्रपट महोत्सवाची घोषणाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली. 

थेट कारवाई करा..! 
भारताचा हेर ठरवून नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने फाशीची शिक्षा सुनावली आहे. याविषयीही उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, 'कुलभूषण जाधव यांच्याबद्दल केवळ भावना व्यक्त करून चालणार नाही. तसेच, पाकिस्तानला फक्त इशारे देऊनही चालणार नाही. आता थेट कारवाईच करून दाखवावी लागेल.'' जाधव यांना केंद्र सरकारने लवकरच परत आणावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

Web Title: BJP-Shiv Sena alliance is on 'ventilator', says Uddhav Thackray