'राज्यात महायुतीचेच सरकार येणार'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

आमचे सरकार माथाडी कामगार चळवळीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आणि आपल्या आशीर्वादाने आमचे भविष्यात आमचेच सरकार येणार असल्याने महायुतीतर्फे चळवळीला पाठिंबा राहील.

- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री. 

नवी मुंबई : राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार आहे, यात काही शंका नाही असे भाकीत करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकांमध्ये युती होणार असल्याचे संकेत दिले.

दिवंगत माथाडी कामगार अण्णासाहेब पाटील यांची जयंती व माथाडी कायद्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्ताने आयोजित माथाडी कामगारांच्या मेळाव्यात नवी मुंबईत येथे ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. फडणवीस यांनीही पुन्हा आपलेच सरकार येणार असल्याचे सूतोवाच केले. पुन्हा आपलेच सरकार येणार पण नुसते येणार, येणार असे म्हणून चालणार नाही, तर जनता-जनार्दनाशिवाय हे सरकार येणार नाही, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी माथाडी कामगारांना मतदान करण्याचे आवाहन केले.

उद्धव ठाकरे पहिल्यांदाच माथाडी कामगारांच्या मेळाव्यात उपस्थित राहिल्याचे त्यांनी बोलून दाखवले. मात्र, तेही उशिरा आल्याबद्दल त्यांनी सर्वांची दिलगिरी व्यक्त केली. तसेच माथाडी कामागारांचा मेळावा हा एक भावनिक सोहळा आहे. अण्णासाहेब पाटील यांच्या लढ्याला त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी बळ दिल्याच्या आठवणींना उद्घव यांनी उजाळा दिला. जर अण्णासाहेब राहिले असते तर उभ्या महाराष्ट्राने एक माथाडी राज्याचा मुख्यमंत्री झाल्याचे पाहिले असते असे भाकीत ठाकरे यांनी केले. आम्ही कोणाला आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवणार नाही पण तुमची ओझी वाहणारे सरकार आले पाहिजे असा विश्‍वास ठाकरे यांनी व्यक्त केला.

पवारांवर गुन्हा दाखल झाला तसा मुख्यमंत्र्यांवरही गुन्हा दाखल करा- शेट्टी

तसेच नेत्याचा एखादा निर्णय जरी चुकला तर संपूर्ण चळवळ वाया जाते. मात्र, माथाड्यांची चळवळ इतक्‍या वर्षांनतरही फुलांप्रमाणे टवटवीत ठेवल्याचे गौरोद्गार ठाकरे यांनी काढले.

आमचे सरकार माथाडी कामगारांच्या पाठीशी

आमचे सरकार माथाडी कामगार चळवळीच्या पाठीशी कालही भक्कमपणे उभे राहिले आहे आणि आपल्या आशीर्वादाने आमचे भविष्यात आमचेच सरकार येणार असल्याने महायुतीतर्फे चळवळीला पाठिंबा राहील, असे सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केला.

राज्यातील माथाडी कायद्याच्या धर्तीवर देशातही कायदा लागू करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मानस आहे. नीती आयोगाने याचा अभ्यासही सुरू केल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

शरद पवार आमचे दैवत

एक कार्यकर्ता म्हणून एक विनंती करत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे दैवत आहेत. राजकीय स्थित्यांतरे होत असताना पवारांवर ईडीच्या माध्यमातून जे गुन्हे दाखल झाले आहेत. हे चुकीचे असेल तर पवारांवर कारवाई करू नये, अशी एक कार्यकर्ता म्हणून आम्ही विनंती करीत आहोत, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी जाहीर सभेत केली. यावेळी गंभीर वातावरण निर्माण झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Shivsena Alliance will form Government in Maharashtra says Uddhav Thackeray Maharashtra Vidhan Sabha 2019