एवढी तूर खरेदी केली, तरी रडतेत साले : रावसाहेब दानवे

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 10 मे 2017

तूर खरेदीचा विषय आता बंद करा, कापूस, तूर, ऊस, बाजरी खरेदीचा विषय कुणीही काढायचा नाही. सरकारने हमीभाव जाहीर केल्यानंतर जर कुणी त्याच्यापेक्षा कमी भावाने माल खरेदी करत असाल, तर सरकार बाजारात उतरतं आणि स्थिरता यावी म्हणून 25 टक्के माल खरेदी करतं, आतापर्यंतच्या इतिहासात साऱ्या सरकारने हेच केलं.

जालना: 'आतापर्यंतच्या इतिहासात सगळ्यात जास्त तूर आपल्या सरकारने खरेदी केली, अजून एक लाख टन तूर खरेदी करणार आहे तरी रडतात साले.'. अशा असभ्य भाषेत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहबे दानवे यांनी आपल्याच कार्यकर्त्याला
झापले.

तू जास्त पेपर वाचतो का? वाचत जाऊ नको. तूर, कापूस, ऊस, बाजरी खरेदी हा विषय आता बंद करा. आपल्या कार्यकर्त्यांनी आता रडायचं नाही तर लढायचं असा उपदेशही दानवे यांनी केला. जालन्याचे पालकमंत्री व राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील बित्तंबातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

शेतकरी कर्जमाफी, तूर खरेदीचा प्रश्‍न आणि शेतीमालाला हमीभाव या मागण्यावरुन शिवसेनेसह विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले आहे. काल नगर येथील कार्यकर्ता मेळाव्यात कर्जमाफीच्या मुद्यावरुन वादग्रस्त विधान केल्यावर आज पुन्हा दानवे यांनी आपल्या तोंडाचा दांडपट्टा चालवला. 

एकीकडे मुख्यमंत्री दिल्लीच्या वाऱ्या करुन तूर खरेदीचा प्रश्‍न कसा सोडवता येईल याचा प्रयत्न करत असतांना त्यांच्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मात्र शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करतांना दिसतात.

लोणीकरांच्या संपर्क कार्यालयाचे उद्धाटन झाल्यानंतर आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत असतांना दानवे यांना भाजप कार्यकर्त्याने तूर खरेदीवर शेतकऱ्यांना काय उत्तर द्यावे असा प्रश्‍न केला.

यावर 'तूर खरेदीचा विषय आता बंद करा, कापूस, तूर, ऊस, बाजरी खरेदीचा विषय कुणीही काढायचा नाही. सरकारने हमीभाव जाहीर केल्यानंतर जर कुणी त्याच्यापेक्षा कमी भावाने माल खरेदी करत असाल, तर सरकार बाजारात उतरतं आणि स्थिरता यावी म्हणून 25 टक्के माल खरेदी करतं, आतापर्यंतच्या इतिहासात साऱ्या सरकारने हेच केलं. 

आमच्या सरकारनं  मात्र सगळी तूर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. ४ लाख टन खरेदी केली आणखी  एक लाख टन तूर खरेदीला पुन्हा सरकारन परवानगी दिली तरी रडतात साले... आता तूरीचा तू कोणी काढायचा नाही, त्याच काय करायंच ते आम्ही पाहून घेऊ असा दम भरला.

सगळ्यात जास्त अनुदान दिलं
स्वातंत्र्यापासूनच्या इतिहासात कधी दिले नाही एवढे चारशे रूपये अनुदान या सरकारनं दिल, तरी बी यंदाच साल खराबच आहे, तुरीला भाव नाही अस रडगाण गातात, मग आधीच्या सरकारन काय केल? हा विषय बंद करा आणि भाजप सरकारने काय
केल ते लोकांना सांगा असे आवाहन दानवे यांनी कार्यकर्त्यांना केले.

Web Title: BJP State president Raosaheb Danve creates another controversy