भाजप प्रदेश उपाध्यक्ष धनंजय मुंडे यांच्या भेटीला; चर्चांना उधाण

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 November 2019

राज्यातील राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी सध्या चर्चेचा विषय ठरत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे  यांच्या भेटीला भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड हे पोहोचल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मुंबई : राज्यातील राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी सध्या चर्चेचा विषय ठरत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे  यांच्या भेटीला भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड हे पोहोचल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. प्रसाद लाड हे धनंजय मुंडे यांच्या मुंबईतील निवासस्थानी गेले आहेत. राज्यात सध्या विविध नेत्यांच्या भेटीने राजकीय वातावरण तापलेले असतानाच लाड आणि मुंडे यांच्या भेटीलाही महत्व प्राप्त झाले आहे.

भाजपविरहित सरकार स्थापन होणार; हालचालींना वेग

आज काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली. तसेच, शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली या भेटी दिवसभरात चर्चेचा विषय ठरल्या होत्या. त्यातच आता उद्या (ता.06) केंद्रिय मंत्री नितीन गडकरी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेणार आहेत. राजकीयदृष्ट्या या भेटीलाही अनन्यसाधारण महत्व आहे.

चंद्रकांत पाटील यांना भाजपकडून मोठा धक्का; प्रदेशाध्यक्षपद जाणार

दरम्यान, काँग्रेस नेत्यांची विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्यावर बैठक पार पडली असून या बैठकीला अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम, हुसेन दलवाई, अमित देशमुख आदी उपस्थित आहेत. शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात काँग्रेस आमदारांच्या भूमिकेवर या बैठकीत चर्चा झाली असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील ओला दुष्काळावर बैठक घेण्यात आली. या बैठकीला शिवसेनेचेही मंत्री उपस्थित होते. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे , दिवाकर रावते, रामदास कदम, दिपक केसरकर आदी या बैठकीला उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP State Vice President Prasad lad meets NCP Leader Dhanajay Munde