भाजपचा धोबीपछाड

भाजपचा धोबीपछाड

सांगली/जळगाव - लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीनंतर महापालिका निवडणुकांमध्ये सुरू झालेली भाजपची विजयी घोडदौड सांगली मिरज कुपवाड आणि जळगाव महानगरपालिकांतही कायम राहिली. या दोन्ही महापालिकांत भाजपने एकहाती निर्विवाद वर्चस्व मिळवून विरोधकांना धूळ चारली. काँग्रेसी विचारधारा मानणाऱ्या सांगली जिल्ह्यात भाजपने गेल्या वेळच्या शून्यावरून थेट ४१ जागा जिंकत निर्विवाद विजय मिळविला, तर जळगावात सुरेश जैन (दादा)यांच्या एकहाती सत्तेला सुरुंग लावत भाजपने ५७ जागांसह बहुमत मिळविले. 

भाजपच्या या झंझावातात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा धुव्वा उडाला, तर आगामी निवडणुका स्वबळावर लढविण्याची भाषा करणाऱ्या आणि सत्तेत राहूनही विरोधकांची भूमिका बजावणाऱ्या शिवसेनेला जळगावात १५ जागा मिळाल्या, तर सांगलीत भोपळा हाती आला. गेली १५ वर्षे सांगली महापालिकेवर काँग्रेसची असलेली सत्ता आता गेली आहे. जळगावात गेली ३५ वर्षे एकहाती सत्ता ठेवणाऱ्या सुरेश जैन यांच्या आघाडीलाही पराभवाचा झटका बसला.

महाराष्ट्र भाजपचा हा नेत्रदीपक विजय आहे. आमच्यावरील विश्‍वास कायम ठेवल्याबद्दल मी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि त्यांच्या संपूर्ण टीमची मेहनत स्तुत्य आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान


मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सरकारने राज्यातील जनतेचे जीवनमान सुधारले आहे. महाराष्ट्रात भाजपला सातत्याने मिळत असलेला पाठिंबा हे जनतेने सरकारच्या कामाला दिलेल्या पसंतीचेच निदर्शक आहे. 
- अमित शहा, भाजपाध्यक्ष

यशाचे कारण
काँग्रेसचा पाच वर्षांचा कारभार गलथान होता. याच पालिकेत विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी होता. दोघांनी संगनमताने कारभार केला. जनतेला तो रुचला नाही. 

सांगलीतील नागरिकांचे विकासाचे स्वप्न भाजप साकार करेल. या शहराला प्रगतीपथावर आणण्यासाठी आणि तरुणाईला रोजगार देण्यासाठी आम्ही नक्‍कीच चांगले नियोजन करू. 
- सुभाष देशमुख, पालकमंत्री

यशाचे कारण
गिरीश महाजन यांनी भाजपची धुरा सांभाळताना, ‘वर्षभरात विकास केला नाही, तर विधानसभेसाठी मत मागणार नाही’, असे आवाहन केले. त्याला जळगावकरांनी प्रतिसाद दिला.

गेल्या ३५ वर्षांपासून जळगावात एकाच गटाची सत्ता असूनही विकास झाला नाही. आता आमची जबाबदारी वाढलीय. वर्षभरात शहराचे चित्र बदलण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.
- गिरीश महाजन, जलसंपदामंत्री


सोळा दिग्गजांना पराभवाचा धक्का
सांगली - महापालिकेच्या कारभारावर एकहाती वचक ठेवू पाहणारे, प्रसंगी बंड करून नेत्यांची कोंडी करणारे आणि नवनवे ‘पॅटर्न’ राबवण्यात माहीर असलेल्या तीन माजी महापौरांसह १६ विद्यमान नगरसेवकांचा या महापालिका निवडणुकीत त्रिफळा उडाला. मिरजेचे काँग्रेस नेते किशोर जामदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते इद्रिस नायकवडी आणि भाजपचे विवेक कांबळे या माजी महापौरांचा त्यात समावेश आहे. मिरज पॅटर्नचे शिलेदार म्हणून यांची विशेष ओळख आहे, ते आता सभागृहात दिसणार नाहीत.

मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यातच कुपवाडचे राष्ट्रवादीचे नेते धनपाल खोत यांना धक्का बसला. त्यांचा पराभव झाल्याने निकालाचा नवा ट्रेंड समोर येत गेला. इद्रिस नायकवडी यांचा पराभव करत जामदारांची नवी पिढी अर्थात करन यांनी महापालिकेत प्रवेश केला. स्थायी समितीचे सभापती बसवेश्‍वर सातपुते, काँग्रेसचे गटनेते किशोर जामदार या दोन मातब्बरांना एकाच प्रभागातून पराभवाचा सामना करावा लागला. जामदार यांचा पराभव त्यांच्या चेल्यानेच म्हणजे गणेश माळी यांनीच केला. 

प्रभाग आठमधून लढणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका स्नेहा औंधकर यांची विकेट भाजपच्या कल्पना कोळेकर यांनी घेतली. कोळेकर आता भाजपच्या महापौर पदाच्या शर्यतीत असतील. सांगलीवाडीत माजी आमदार दिनकर पाटील यांच्या चिरंजीवाने अखेर नगरसेवक दिलीप पाटील यांची दांडी उडवली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com