esakal | कोरोनात औषधांचा काळाबाजार; कशी ओळखाल बनावट औषधं?
sakal

बोलून बातमी शोधा

remdesivir

कोरोनात औषधांचा काळाबाजार; कशी ओळखाल बनावट औषधं?

sakal_logo
By
सम्राट कदम : सकाळ वृत्तसेवा

पुणे- कोरोनाच्या वैश्विक साथीत औषधांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. त्यात राज्यात सुरवातीपासूनच रूग्णसंख्या जास्त असल्याने औषधांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेट्सचीही राज्यावर नजर आहे. औषधांचा तुटवडा आणि नागरिकांमधील जागृतीचा अभाव यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर बोगस औषधांचा सुळसुळाट दिसत आहे, अशी माहिती मुंबईतील शासकीय न्यायविज्ञान संस्थेच्या न्यायवैद्यक आणि कायदा विभागाचे प्रमुख अमोल देशमुख यांनी दिली.

गुजरात, दिल्ली, हैदराबाद आदी ठिकाणातील बोगस किंवा औषधांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेट्सचा राज्यावर नजर होती. रेमडेसिव्हिरसह इतर औषधांचा मोठा प्रमाणावर तुटवडा भासल्याने नागरिकांनी मिळेल त्या ठिकाणाहून अनधिकृत लोकांकडून औषधे घेतली. विशेषतः अनधिकृत औषध विक्रेते, औषध दुकाने, वैद्यकीय कर्मचारी आदींच्या माध्यमातूनही बोगस विक्री करण्यात आली. देशमुख म्हणाले,‘‘या क्षेत्राशी निगडित लोकांचे अशी बनावट औषधांचे मार्केटिंग करणारे रॅकेट आहे. काही औषधे तर ५० ते ५ लाख रुपयांपर्यंत अनधिकृत रित्या विकल्यागेल्याचे निदर्शनास आले आहे. रेमडिसिव्हिरमध्ये तर ग्लुकोज आणि पॅरासिटमॉल टाकल्याचे दिसले.’’ यासंबंधीचा सविस्तर अहवाल शिक्षण संचालक डॉ. धनंजय माने यांच्याकडे सादर करणार असून, नागरिकांनी जर सतर्कता बाळगली तर अशा काळ्याबाजाराला आळा बसेल. असे मत देशमुख यांनी व्यक्त केले.

हेही वाचा: नागरिकांना बेड आणि औषधं वेळेत मिळावेत म्हणून कंट्रोल रूम स्थापन

अशी ओळखा बनावट औषधे...

१) पॅकिंगसहीत घ्या

- गोळी, बॉटल किंवा वायल्स अशा कोणत्याही प्रकारातील औषध त्याच्या पूर्ण पॅकिंगसहीत विकत घ्या

- सोबतचे माहितीपत्रकही तपासा

- इंटरनेटवर अधिकृत संकेतस्थळावर दिल्या प्रमाणेच पॅकिंग आहे का हे तपासा

२) ब्रॅंडवर द्या लक्ष ः

- शक्यतो माहितीतल्या ब्रॅंडची औषधे खरेदी करा

- त्याची किंमत, माहिती इंटरनेटवर शोधा आणि पडताळून पहा

- त्या ब्रॅण्ड किंवा औषधाच्या नावाचा रंग, फॉंट, अक्षरे तपासा

- त्यावरील कंपनीचा लोगो, ट्रेडमार्क, होलोग्राम आदी पडताळून घ्या

३) भौतिक परिक्षण करा ः

- एकंदरीत पॅकिंग औषधाच्या गोळीचा किंवा बॉटलचा आकार, रंग तपासा

- तरल पदार्थ असेल तर एकसमानता हवी

- सुरक्षा कवच धातूचे किंवा प्लॅस्टिकचे

असते, ते तुटलेले नाही ना, हे तपासा

हेही वाचा: खळबळजनक; कमी वेळात नशा देणारी औषधं आढळली चक्क जैविक कचऱ्यात

४) किंमत व मुदत छपाई ः

- औषधाच्या पॅकिंगवर किंमतीची छपाई नंतर होते

- त्याची जागा निश्चित असते, तिथे खाडाखोड नसावी

- छपाईचा फॉंट, रंग आदी सारखाच असतो

- त्यावर सिरीज क्रमांक, बॅच क्रमांक पडताळून घ्या

५) पत्ता पडताळून घ्या ः

- किमतीच्या खाली कंपनीचा कायमस्वरूपीच पत्ता असतो

- तो खरंच अस्तित्वात आहे का हे पडताळा

- इंटरनेटवर पीन क्रमांक किंवा गुगलमॅपच्या द्वारे पडताळा

- बाहेरच्या देशातून औषध आले असेल, तर लायसन्स, बॅच क्रमांक पडताळा

६) ऑनलाइन व मोबाईल संदेशाद्वारे पडताळणी ः

- मोठ्या कंपन्या औषधाच्या पॅकिंगवर युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (युआयडी) देतात

- पॅकिंगवर दिल्या गेलेल्या क्रमांकावर एसएमएस केल्यास ‘व्हेरिफाइड’ असल्याचा मेसेज येतो

- यासाठी कंपनीची मोबाईल ऑथंटीकेशन सर्विस असते, तसेच इंटरनेटवरही तपासू शकता

- काही ठिकाणी बारकोड किंवा क्युआरकोड असतो, तो स्कॅन करा व माहिती घ्या

- त्यासाठी कंपनीने स्कॅनिंग ॲप्लिकेशनही दिलेले असू शकते

हेही वाचा: डॉक्टरांच्या सल्ल्यांशिवाय औषधं घेताय? चुकीच्या औषधोपचारांमुळे हृदयविकार वाढण्याचा तज्ज्ञांचे इशारा 

बनावट औषध मिळाल्यास काय कराल...

संबंधित व्यक्ति किंवा दुकानदार बनावट औषध विकत असल्याचे समजल्यास त्वरित जवळच्या पोलिस स्टेशनला कळवा. तसेच, अन्न व औषध प्रशासनाकडे त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तक्रार करू शकता. तसेच, मुळ औषध कंपनीला कळविल्यास ते ही कारवाई करू शकता.

आपल्याला औषध ओळखण्यास फारच अडचण असेल तर आपल्या ओळखीतील किंवा अधिकृत विक्रेत्यांकडे जाऊन ते पडताळून घ्या. लोकांमध्ये जागृती वाढली तर आपोआपच औषधांचा काळाबाजार बंद होईल. कोरानाच्या साथीच्या काळात याचे प्रमाण वाढू शकते, असं न्यायवैद्यक व कायदा विभाग प्रमुख अमोल देशमुख म्हणाले.