Karnataka SSLC 10th Exam
esakal
तात्या लांडगे
सोलापूर : कॉपीमुक्त परीक्षेसाठी बोर्डाने विद्यार्थी व पर्यवेक्षकांसाठी सरमिसळ पद्धत अवलंबली. त्यानंतर आता प्रत्येक केंद्रांना सीसीटीव्ही कॅमेरे व पक्क्या वॉल कंपाउंडची अट घातली आहे. याशिवाय यंदा विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकावेळी सुद्धा बोर्डाची पथके काही शाळांना अचानक भेटी देऊन पाहणी करणार आहे. दरवर्षी शिक्षणाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखालील पथकांकडून भेटी दिल्या जात होत्या.
यावर्षी इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या काळात होणार आहे. त्यानंतर त्यांची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्चपर्यंत होईल. दहावीच्या विद्यार्थ्यांचे तोंडी तथा प्रात्यक्षिक २ ते १८ फेब्रुवारी दरम्यान पार पडेल. त्यांची लेखी परीक्षा २० फेब्रुवारीला सुरू होईल आणि १८ मार्च रोजी संपणार आहे. दरम्यान, आता प्रत्येक परीक्षा केंद्रांची पडताळणी सुरू आहे.
प्रत्येक केंद्रावरील वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बंधनकारक आहे. दुसरीकडे त्या केंद्र शाळेला पक्की संरक्षक भिंती, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सोय, अशा सुविधा देखील आवश्यक आहेत. त्याचे सद्य:स्थितीचे फोटो पाठविले जात आहेत. ज्या केंद्रावर सीसीटीव्ही नाहीत, त्यांना परीक्षेपूर्वी कॅमेरे बसवावे लागणार आहेत.
पारदर्शक होईल परीक्षा
दरवर्षी दहावी- बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेवेळी जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांची पथके काही शाळांना भेटी देऊन पाहणी करायचे. पण, आता बोर्डाकडूनही पथके नेमली जाणार आहेत. ही पथके प्रत्येक जिल्ह्यातील २० ते २५ टक्के शाळांना अचानक भेटी देऊन प्रात्यक्षिक परीक्षेची पाहणी करतील. पारदर्शकपणे परीक्षा व्हावी हा त्यामागील हेतू आहे.
- औदुंबर उकिरडे, विभागीय अध्यक्ष, पुणे बोर्ड
पुढे प्रात्यक्षिक परीक्षा बंद होणार
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षेचा पॅटर्न बदलणार आहे. सेमिस्टर पद्धतीने वर्षातून दोनदा विद्यार्थ्यांची परीक्षा होईल. दुसरीकडे आता प्रत्येक विषयाला २० गुण प्रात्यक्षिक, तोंडी चाचणीतून दिले जातात. परंतु, दोन वर्षांनी म्हणजेच २०२७-२८ च्या बोर्ड परीक्षेवेळी प्रात्यक्षिक गुण देण्याची पद्धत बंद होणार आहे. त्याऐवजी १०० गुणांच्या प्रश्नपत्रिकेत ३० गुणांचे वस्तुनिष्ठ प्रश्न असतील. बाकीच्या प्रश्नांची उत्तरे घोकमपट्टी करून लिहिणारे नसतील. विद्यार्थ्यांना सहजासहजी विचार करून त्या प्रश्नांची उत्तरे लिहिता येतील, असे ७० गुणांचे प्रश्न असतील, असे बोर्डातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले.