मुंबई हायकोर्टाला पत्रकारांच्या जीन्स, टी शर्टचे वावडे

टीम ई सकाळ
बुधवार, 29 मार्च 2017

पत्रकारांनी जीन्स आणि टी शर्ट घालावेत की नको, याबद्दल आता कदाचित मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल! आज (बुधवार) उच्च न्यायालयात बातम्यांसाठी उपस्थित असलेल्या पत्रकारांना मुख्य न्यायाधिश मंजुला चेल्लूर यांनी विचारणा केली, की जीन्स आणि टी शर्ट ही योग्य वेशभुषा आहे का?

मुंबई : पत्रकारांनी जीन्स आणि टी शर्ट घालावेत की नको, याबद्दल आता कदाचित मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल! 

आज (बुधवार) उच्च न्यायालयात बातम्यांसाठी उपस्थित असलेल्या पत्रकारांना मुख्य न्यायाधिश मंजुला चेल्लूर यांनी विचारणा केली, की जीन्स आणि टी शर्ट ही योग्य वेशभुषा आहे का?

न्या. चेल्लूर यांनी अशी वेशभुषा म्हणजे 'बॉम्बे कल्चर' आहे का, अशीही विचारणा केली. मुख्य न्यायाधिशांच्या अनपेक्षित टिप्पणीने दुखावलेल्या पत्रकारांनी कोर्टातून बाहेर पडून आपला निषेध नोंदवला. 

 

एका राष्ट्रीय वृत्तपत्राच्या पत्रकाराने केलेल्या ट्वीटनुसार, पत्रकारांनी कोर्टात ड्रेसकोड पाळला पाहिजे, याकडे मुख्य न्यायाधिशांचा इशारा होता. महाराष्ट्रातील डॉक्टरांच्या संपाबाबतच्या याचिकेवर न्या. चेल्लूर आणि न्या. जी.एस. कुलकर्णी यांच्यासमोर सुनावणी असताना न्या. चेल्लूर यांनी ही टीप्पणी केली. 

पत्रकारांनी सरन्यायाधिशांना यासंदर्भात पत्र लिहिण्याचे ठरविले आहे. न्यायमूर्तींनी टीप्पणी केली, तेव्हा किमान दहा टीव्ही चॅनेल्सचे आणि वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी कोर्टात हजर होते. 

यापूर्वी 2015 मध्ये स्लिव्हलेस ड्रेस घातलेल्या महिला पत्रकाराला मुंबई हाय कोर्टात जाण्यापासून तेथील पोलिसांनी रोखले होते. 2011 मध्ये कोर्टाने केलेल्या एका नियमाचा आधार त्यावेळी घेतला गेला होता. 'नीट कपडे न घातलेल्यांना कोर्टाच्या आवारात प्रवेश देऊ नये,' असा नियम मुंबई हायकोर्टाने 2011 मध्ये केला आहे. 

Web Title: Bombay high court chief justice Manjula Chellur remarks about wearing jeans