शेट्टी - खोत मनभेद दूर होणार का?

ब्रम्हदेव चट्टे
शुक्रवार, 3 मार्च 2017

सदाभाऊ खोत भाजपच्याच सद्स्यत्वावर विधानपिरषदेचे आमदार झाले आहेत. पक्षांतराचा परिणाम त्यांच्यावर होणार नाही. मात्र, त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये फूट पडणार असल्याने संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

मला आता सदाभाऊ यांना फोन करायची गरज पडत नाही ते आता मंत्री आहेत अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासोबत सुरू असल्या विसंवादाला वाट मोकळी केली. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये विसंगत प्रतिक्रीयेबद्दल विचारले असता खासदार राजू शेट्टी म्हणाले, सदाभाऊंना अर्थसंकल्पातील जास्त कळत म्हणून त्यांनी अर्थसंकल्पाची तोंडभरून कौतूक केले आहे. मात्र अर्थसंकल्पातील फोलपणा त्यांच्या लवकरच लक्षात येणार असल्याचा आशावादही खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राज्यामंत्री सदाभाऊ खोत यांना आपल्या मुलाचा जिल्हा परिषदेत झालेला पराभव भलताच जिव्हारी लागला आहे. खासदार राजू शेट्टी यांनी आयुष्यभर तत्वाचेच राजकारण करावे असा खोचक सल्ला दिला आहे. त्याचवेळी गोफण तयार आहे योग्यवेळी भिरकावण्यास तयार असल्याचे सांगत यांनी शेट्टी यांच्या बरोबरच्या मनभेदाला यापुर्वीच दुजारा दिला आहे. तर वाढत्या विसंवादाची सहमतीच आज खासदार राजू शेट्टी यांनी दिली. राज्यमंत्री सदाभाऊ खोत मुख्यमंत्र्यांशी जवळी साधत भाजपवासी होणार असल्याच्या शक्यतेने राजू शेट्टी कमालीचे दुखावले गेले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. लालदिव्याची उब कमालीच जोरात असून राज्यमंत्री सदाभाऊ खोत  खासदार राजू शेट्टी यांचे फोनही घेत नसल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.  दोन्ही स्वाभिमानी नेत्यांमधील दरी वाढतच असून मनभेद दूर होणार का ? असा प्रश्न स्वाभिमानीच्या कार्यकर्तांसह राजकिय पंडीतांनाही पडला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडू नये म्हणूनच खासदार राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांना मंत्रीपद मिळण्यासाठी आपली राजकिय शक्तीपणाला लावली होती. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातून सदाभाऊ यांना विधानपरिषदेचे आमदारकी देत राज्यमंत्रीपदही बहाल करण्यात आले होते. सदाभाऊ खोत सत्तेत सहभागी झाल्यानंतर लाल दिव्याची गाडी संघटनेला मिळाल्याने कार्यकर्तांच्यात प्रचंड उत्साह संचारला होता. मात्र, स्वाभिमानीचे कार्यकर्ते मंत्रीपद मिळालेपण कामे होत नसल्याची तक्रार खासदार राजू शेट्टी यांच्याकडे करत होते. तर खासदार राजू शेट्टींच्या नेतेपदालाच सदाभाऊ यांच्या रूपाने आव्हान निर्माण होत असल्याने खासदार राजू शेट्टीही अस्वस्थ आहेत. परिणामी राजू शेट्टी आणि मंत्री सदाभाऊ यांच्यात विसंवाद वाढत असून या दोन्ही नेत्यांमध्ये संवाद खुंटला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

स्वाभिमानीची संभाव्य फूट टळणार ?
नुकत्याच सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर खासदार राजू शेट्टी यांनी प्रचंड टीका केली होती तर राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या अर्थसंकल्पाचे तोंडभरून कौतूक केले होते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत खासदार राजू शेट्टी यांनी नाशिकमध्ये शिवसेनेला पाठींबा देत भाजपवर केलेली टीका सदाभाऊ परतवून लावत होते. एकीकडे राजू शेट्टी भाजपच्या विरोधात प्रचारात रान उठवत असतानाच कमळ चिन्ह असलेले उपरणे गळ्यात घालून सदाभाऊ भाजपचा प्रचार करत होते. यावरूनही संघटनेच्या कार्यकर्तांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतले मंत्री म्हणून सदाभाऊ परिचित होणार असून सदाभाऊ हे भाजपच्याच सद्स्यत्वावर विधानपिरषदेचे आमदार झाले आहेत. त्यामुळे पक्षांतराचा परिणाम त्यांच्यावर होणार नसल्यानेच ते लवकरच भाजपवासी होणार असल्याचे समजते. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याअगोदरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये मात्र फूट पडणार असल्याने संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे स्वाभिमानीची संभाव्या फूट टळणार का असा सवाल विचारला जात आहे. याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी मंत्री सदाभाऊ खोत परदेश (दुबई) दौऱ्यावर असल्याने त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.

Web Title: Bramhdev Chatte writes on discontent between Raju Shetty, Sadabhau Khot