350 वर्षांची परंपरा असलेली भेंडवडची घटमांडणी अक्षयतृतीयेला होणार, संपूर्ण राज्याचं लक्ष भाकि‍ताकडे

भेंडवडची घटमांडणी
भेंडवडची घटमांडणीsakal

Buldhana News: राज्याबाहेर ख्याती प्राप्त असलेल्या घटमाडणीची परंपरा आजही जपली जात आहे. खरीप व रब्बी हंगामातील पीक परिस्थिती,पावसाचा त्याचबरोबर सामाजिक,आर्थिक आणि देशाच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज सांगणारी विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली भेंडवडची घटमांडणी यावर्षी १० मे रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर केली जाणार आहे. तर भाकीत ११ मे ला पहाटे वर्तविण्यात येणार आहे.या वर्षीच्या भाकीताकडे संपूर्ण शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

पीक परिस्थितीचा अंदाज,अतिवृष्टी,दुष्काळ,देशाची आर्थिक परिस्थिती,राजकीय भाकीत,पृथ्वीवर येणारी संकटे,परकीय शत्रू पासून होणारे धोके अशा अनेक प्रश्नांचे अंदाज मांडणाऱ्या भेंडवड मांडणीच्या भाकिताकडे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले असते. या घटमांडणी चे भाकीत ११मे रोजी वर्तविले जाणार आहे. पाऊस, पीक परिस्थिती, राजकीय स्थिती तसेच आर्थिक संकटे याबाबत भाकीते या घटमांडणीतून वर्तविले जातात. त्यामुळे सामान्य जनतेत मांडणीची प्रचंड उत्सुकता असते.

बुलडाणा जिल्ह्यामध्ये जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या भेंडवड या गावी घटमांडणीची ही परंपरा सुमारे साडे तीनशे वर्षापासून सुरू आहे.

भेंडवडची घटमांडणी १० मे रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी केली जाईल. मांडणीचे भाकीत ११ मे रोजी पहाटे चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज हे जाहीर करणार आहेत.घटमांडणी नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत केली जाणार आहे. प्रसारमाध्यमांद्वारे घटमांडणी ची प्रसिद्धी होत असली तरीही शेतकरी मोठ्या उत्साहाने या घटमांडणी चे भाकीत ऐकण्यासाठी उपस्थित असतात.

अशी होते घटमांडणी.....

अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी गावाबाहेर बस स्टॅन्ड शेजारच्या शेतामध्ये घटाची मांडणी करण्यात येते. घटामध्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद .मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा, मसूर, करडी. इत्यादी अठरा प्रकारचे धान्य ठेवण्यात येतात. घटाच्या मध्यभागी मातीची ढेकळे त्यावर पाण्याने भरलेली घागर ठेवतात. पानसुपारी, पुरी, पापड, सांडोळी- कुरडई हे खाद्यपदार्थ ठेवले जातात. रात्रभर त्या ठिकाणी कोणीही थांबत नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे या घटांमध्ये झालेल्या बदलाचे निरीक्षण केले जाते. त्यानंतर भाकीत वर्तविण्यात येते.यातील बरीच भाकिते खरी ठरल्याचे लोक सांगतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा या मांडणीवर विश्वास आहे.दरवर्षी भाकीत ऐकण्यासाठी हजारो शेतकरी जमतात.भाकीत ऐकून खरीप व रब्बी हंगामात नेमकं कोणतं पीक घ्यावं याबाबत शेतकरी आपले नियोजन करतात.

राजा कायम राहणार का? याची उत्सुकता :-

भेंडवड च्या घटमांडणीत राजकीय परिस्थितीचं भाकीत करण्यात येते.घटमांडणीत असलेल्या पानविडा व सुपारी या वरून देशाचा राजा कायम राहणार की काही बदल होणार याबाबत भाकीत करण्यात येईल. नुकत्याच लोकसभेच्या निवडणुकांना सुरुवात झाली असून ४ जून रोजी निकाल येणार आहेत तत्पूर्वी राजकीय परिस्थितीबाबत भाकीत वर्तविण्यात येणार असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागून आहे.मागील वर्षीच्या घटमांडणीत राजा कायम राहणार असल्याचे भाकीत करण्यात आले होते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com