नाशिक महामार्गावर तिसऱ्या दिवशी बस बंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

पुणे - मराठा क्रांती मोर्चातर्फे मराठा आरक्षणासाठी करण्यात येत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी पुणे-नाशिक महामार्गावरील एसटी सेवा महामंडळाकडून बंद ठेवण्यात आली. तसेच औरंगाबाद मार्गावरही आंदोलन सुरू असल्याने आज पुण्यातून या मार्गावर एकही गाडी सोडली नाही. 

नाशिक महामार्गावरील चाकण येथील आंदोलनात एसटी गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे सोमवारी दुपारपासूनच नाशिक महामार्गावरील एसटीची सेवा बंद केली आहे. दरम्यान, औरंगाबाद मार्गावरही शिरूर येथे आज मराठा आरक्षणासाठी आंदोलन होणार असल्याची माहिती मिळाल्याने सकाळपासूनच या मार्गावर एकही गाडी सोडली नाही. तसेच नाशिक आणि औरंगाबाद येथून पुण्यात एसटीची एकही गाडी आली नाही. 

शिवाजीनगर आगारातून पुणे-नाशिक मार्गावर दररोज ३३ फेऱ्या होतात. मात्र तीन दिवस ही सेवा बंद आहे. त्यामुळे दररोज सात ते आठ लाखांचे नुकसान होत आहे. शिवाजीनगरहून पुणे-औरंगाबादला २७ फेऱ्या होतात. आज या मार्गावरील सेवा बंद ठेवल्याने एसटीचे पाच लाखांचे नुकसान झाले. शिवाजीनगरहून दररोज पुणे-भीमाशंकर मार्गावर १५ फेऱ्या होतात. मात्र तीन दिवसांपासून ही सेवा बंद असल्याने दररोज तीन लाखांचे नुकसान झाल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली. दरम्यान, नाशिक आणि औरंगाबादला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळता यावी यासाठी दोन्ही महामार्गावरील परिस्थितीचा आढावा घेऊन रात्रीच्या सुमारास मार्गावर गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही एसटी प्रशासनाने स्पष्ट केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bus stopped on the Nashik highway on the third day