Property Tips: जागा, जमीन, प्लॉट खरेदी करताय का? ‘या’ बाबी माहिती करून द्या, तुमची फसवणूक होणार नाही

महापालिकेची मान्यता तपासूनच सदनिका किंवा भूखंड खरेदी करावा. ज्या जमिनीवर प्लॉट, इमारत विकली जात आहे, त्या जागेची मालकी तपासावी. जमीन कोणाच्या नावावर आहे, हे पडताळावे. ज्या व्यक्तीच्या नावे जमीन नोंदणीकृत आहे, त्या व्यक्तीच्या स्वाक्षरीचे विक्रीपत्र घ्यावे.
precautions before buying a property
precautions before buying a property sakal

सोलापूर : कोणतीही जमीन जोपर्यंत शेतजमीन आहे, तोपर्यंत भूखंड (प्लॉट) म्हणून खरेदी करू नये. जर कोणी प्लॉट म्हणून डायव्हर्जनशिवाय शेतजमीन विकत असल्यास फसवणूक होऊ शकते. महापालिकेची मान्यता तपासूनच बिल्डरकडून सदनिका किंवा भूखंड खरेदी करावा.

ज्या जमिनीवर प्लॉट किंवा इमारत विकली जात आहे, त्या जागेची मालकी तपासावी. ती जमीन कोणाच्या नावावर आहे, हेही पडताळावे. ज्या व्यक्तीच्या नावावर जमीन नोंदणीकृत आहे, त्याच व्यक्तीच्या स्वाक्षरीचे विक्रीपत्र घ्यावे.

मालमत्ता खरेदी करताना, सर्वप्रथम त्याचे नामांतरण तपासणे आवश्यक आहे. महापालिका व ग्रामपंचायतीच्या खात्यावर मालमत्ता कोणत्या नावाने नोंदवली जाते, हे पाहावे.

त्या मालमत्तेची महापालिकेच्या मालमत्ता कर खात्यात कोणत्या नावाने नोंद झाली आहे. त्या मालमत्तांचा मालमत्ता कर कोणाच्या नावावर भरला जातो, हे देखील पाहावे.

तर ग्रामपंचायत आणि नगरपालिकेच्या रजिस्टरमध्येही अशीच नोंद आहे का? तेही तपासावे. कोणत्याही मालमत्तेचे नामांकन आवश्यक असते.

कारण, सरकारी नोंदीमध्ये ती व्यक्ती मालमत्तेची मालक असते, बहुतेक प्रकरणांमध्ये, नामनिर्देशन त्याच व्यक्तीच्या नावावर असते.

मात्र, अशी अनेक प्रकरणे आहेत, ज्यात मालमत्तेचा मालक एक असून नावाचे हस्तांतर दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर आहे. अशी मालमत्ता खरेदी करू नये, असे कायदेतज्ज्ञ सांगतात.

बिल्डरकडून मालमत्ता घेताना काळजी घ्या

सध्या बिल्डरकडून घर खरेदी करण्याचा ट्रेंड वाढला आहे. देशात या प्रकारच्या खरेदी-विक्रीसाठी ‘रेरा’ कायदा लागू करण्यात आला आहे. बिल्डर्सचे नियमन करणारा तो कायदा असून जनतेशी फसवणूक प्रतिबंधित करतो.

कोणत्याही जमिनीवर वसाहत विकसित झाली की, ती वसाहत दोन प्रकारे विकसित होते. पहिली म्हणजे बिल्डर स्वत: मालमत्ता खरेदी करून स्वत:च्या नावावर करतो.

दुसऱ्या प्रकारात बिल्डरने एखाद्या मालमत्तेच्या मालकाशी करार करून त्यावर वसाहत विकसित करेल आणि नंतर तो प्लॉट विकेल.

अशा स्थितीत प्लॉटची विक्री जमीन मालकाकडूनच केली जाते. जमिनीची मालकी ज्याच्याकडे आहे त्यालाच जमिनीवरील प्लॉट विकण्याचा अधिकार आहे. त्यामुळे बिल्डरकडून घर घेताना आधी त्या वसाहतीचे डायव्हर्जन आणि महापालिकेचे कायदे तपासले पाहिजेत.

अशी वसाहत विकसित करण्यासाठी संबंधित महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद आणि ग्रामपंचायतींनी वैध मान्यता दिली आहे का? त्यासोबतच ज्या जमिनीवर वसाहत उभारली जाणार आहे, त्या जमिनीचे डायव्हर्जन झालं आहे का? या गोष्टी तपासून घ्या.

मालमत्तेचा खरा मालक जाणून घ्या

मालमत्ता दोन प्रकारची असते. एक, जी मालमत्ता एकच व्यक्ती अनेक वर्षांपासून वापरत आहे. उदा. जमीन किंवा शेती. दुसरी मालमत्ता म्हणजे बिल्डरने विकसित केलेली. ती मालमत्ता प्लॉट किंवा फ्लॅटच्या माध्यमातून लोकांना विकली जाते.

जमीन खरेदी करताना, आपण खरेदी करत असलेल्या जमिनीचा मालक कोण आहे, हे जाणून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे? त्या मालमत्तेचे 'टायटल' तपासावे. त्यासाठी वकिलांची मदत घेता येईल.

जमिनीच्या रजिस्ट्रीच्या जुन्या कागदपत्रांसह सर्व महत्त्वाची कागदपत्रे तपासून घ्यावीत. जेणेकरून आतापर्यंत कितीवेळा जमीन विकली किंवा विकत घेतली गेली किंवा जमिनीवर किंवा मालमत्तेवर कर्ज घेतले गेले की नाही, हे तपासता येईल.

निबंधक कार्यालयातून घ्या कागदपत्रे

कर्ज घेतलेले असल्यास, कर्जाची पूर्ण परतफेड झाली का आणि जमिनीचा खरा मालक कोण, हे पडताळणीसाठी निबंधक कार्यालयातून जमिनीशी संबंधित कागदपत्रांची माहिती घेऊन तुम्ही खरेदी करणार असलेल्या जमिनीचे किंवा मालमत्तेचे मोजमाप विक्रेत्याने सांगितल्याप्रमाणे आहे की नाही किंवा कोणताही संभ्रम नाही, हे जाणून घ्यावे.

जमीन खरेदी करण्यापूर्वी स्थानिक वृत्तपत्रात त्याबाबत जाहीर सूचना द्यावी. जेणेकरून मालमत्तेवर कुणा दुसऱ्या व्यक्तीचा हक्क असेल तर ते कळू शकेल.

सर्व बाबींची पडताळणी करूनच मालमत्ता घ्यावी

संबंधित जागा, जमीन त्याच्या नावावर कशी झाली, या फेरफार तपासावेत. कायदेशीर सर्च रिपोर्ट बनवून घ्यावेत. वर्तमानपत्रात जाहीर नोटीस द्यावी. महापालिका व राज्य शासनाच्या आरक्षणासंदर्भातील कागदपत्रे पाहावीत. मालमत्तेचा ‘झोन’ (यलो, ग्रीन वगैरे) पाहावा. तसेच भूसंपादनासंदर्भातील देखील कागदपत्रे पडताळावीत.

- संतोष न्हावकर, ज्येष्ठ विधिज्ञ, माजी जिल्हा सरकारी वकील, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com