कॅबिनेट मंत्र्यांच्या मतदारसंघात आनंदीआनंद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बहुप्रतीक्षेत
cabinet minister
cabinet ministersakal

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बहुप्रतीक्षेत मंत्रिमंडळ मंगळवारी अस्तित्वात आले. राज्यातील सर्व भागांना प्रतिनिधित्व मिळेल, अशी दक्षता या नेत्यांनी घेतली असली तरी अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांच्या समावेशाने नाराजाही व्यक्त होत आहे. मंत्रिमंडळात निवड झालेल्या भाजप व शिंदे गटातील आमदारांच्या मतदारसंघात कार्यकर्त्यांनी आज जल्लोष केला. पेढे वाटप, फटाक्यांची आतषबाजी, काही ठिकाणी मिरवणूक काढून आनंद व्यक्त करण्यात आला.

‘अब्दुल सत्तार मंत्री होणारच होते’

सिल्लोड (जि. औरंगाबाद) ः अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच सिल्लोड शहरासह ग्रामीण भागात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. शहरातील चौकाचौकांमध्ये फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ढोलताशांचा गजर, गुलालाची उधळण करीत कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला.

आमदार अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद मिळेल, असा ठाम विश्वास पदाधिकारी व कार्यकर्त्यांना होता. त्यामुळे शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहता यावे यासाठी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात नियोजन करण्यात आले होते. शपथविधी होताच कार्यकर्त्यांनी प्रथम जनसंपर्क कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख देविदास लोखंडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन गाढे, नगराध्यक्षा राजश्री निकम यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

नंदुरबार : भाजपचे नेते डॉ. विजयकुमार गावित यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले. शहर व जिल्ह्यात त्यांच्या मंत्रिपदाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी करीत ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा सर्वोच्चपदी द्रौपदी मुर्मू यांना स्थान दिले. आदिवासी समाजाला न्याय दिला.

तर दुसरीकडे जागतिक आदिवासी दिनी राज्याच्या मंत्रिमंडळात डॉ. विजयकुमार गावित यांना स्थान देऊन नंदुरबार जिल्ह्याला न्याय दिला. गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारमुळे रखडलेली विकास कामे वेगात होतील. शहाद्यात ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करत डॉ. गावित समर्थकांनी जल्लोष केला.

औरंगाबादला प्राधान्य

‘संभाजीनगर’ असे नवे नामकरण झालेल्या औरंगाबादला देखील भक्कम स्थान मिळाले आहे. दिवंगत नेते मोरेश्वर सावे यांचे पुत्र भाजपचे नेते अतुल सावे हे पूर्वीच्या फडणवीस सरकारमध्ये शेवटच्या काही महिन्यात राज्यमंत्री झाले होते. आज त्यांना भाजपने कॅबिनेट दर्जा दिला. पैठणचे आमदार संदीपान भुमरे हे त्यांनाही शिंदे यांनी प्रतिनिधित्व दिले आहे. भुमरे यांची मंत्रिपदी निवड झाल्यानंतर पैठण येथे बसस्थानक परिसरात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.

सामंत तिसऱ्यांदा मंत्री

रत्नागिरी ः एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात अपेक्षेप्रमाणे रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांचा समावेश झाला. सामंत यांनी राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेताच त्यांच्या समर्थकांनी रत्नागिरीत जोरदार जल्लोष केला. मारुती मंदिर सर्कल आणि सामंत यांच्या संपर्क कार्यालयात फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणा देत हा आनंदोत्सव साजरा केला. एकनाथ शिंदे गटातील उदय सामंतांना मंत्रिपद मिळणार, अशी चर्चा होती. ‘उदय सामंत आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, अशा अनेक घोषणा देत समर्थकांनी आनंद साजरा केला.मात्र यामध्ये मूळ शिवसैनिक कुठेच दिसला नाही. या जल्लोषापासून उद्धव ठाकरे समर्थक मात्र लांब होते.

नऊ खात्यांची जबाबदारी

उदय सामंत हे २००४ मध्ये पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर अल्पावधीतच मंत्री बनले. २०१३ मध्ये नगरविकास राज्य मंत्रिपदासह अन्य नऊ खात्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळली. २०१६ मध्ये अंदाज समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. २०१८ मध्ये ‘म्हाडा’चे अध्यक्ष म्हणून त्यांना संधी मिळाली. २०१९ मध्ये उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि २०२० पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सहज पेलली.

भाजप कार्यकर्ता झाला मंत्री

मुंबई ः शिवसेनेतील असंतुष्टांनी केलेल्या उठावाची भाजपतर्फे हाताळणी व देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील अदृश्य साखळीचे काम केले ते डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी. जवळपास दीड वर्षे चव्हाण हे ‘पोटातले पाणी हलू न देता अन ओठावर एक शब्दही न आणता,’ या रणनीतीची तयारी करत होते. विधान परिषदेच्या निवडणुकीचे मतदान आटोपताच सुरतकडे निघालेल्या शिंदे गटाची इत्थंभूत माहिती रवी चव्हाण यांना होती अन ते ती योग्य ठिकाणी पोहोचवतही होते. गुवाहाटीहून शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांसमवेत महाराष्ट्रात परतले तेव्हा त्यांच्या शेजारी बसले होते रवी चव्हाण. विद्यार्थी परिषदेपासून विनोद तावडे यांच्या समवेत असलेल्या चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मनातही जागा केली आहे.

टपरीवाले गुलाबराव व महाजन मंत्री

जळगाव ः पानटपरी चालविणारे शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील तिसऱ्यांदा मंत्री झाले, तर ज्यांना टपरीवरील आमदार म्हटले जायचे ते भाजपचे नेते गिरीश महाजन दुसऱ्यांदा मंत्री झाले आहेत. भारतीय युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदापासून ते प्रदेशाध्यक्षपदापर्यंत महाजन यांनी भरारी घेतली. ते १९९६ मध्ये प्रथम जामनेर विधानसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून निवडून आले.आपल्या कार्यकर्त्यांना ते चौकात, तसेच पानटपरी असे कुठेही सहज भेटत असत, आमदार झाल्यानंतर त्यांच चौकातच मित्र व कार्यकर्त्यासोबत गप्पांचा फड जमत असे. त्यामुळे त्यांना विरोधक टपरीवरचा आमदार असे म्हणत असे, परंतु महाजन यांना त्याचा राग आला नाही, उलट ‘होय मी टपरीवरचा सर्वसामान्य जनतेला भेटणारा आमदार आहे. त्याचा मला अभिमान आहे, असे ते सांगत असत.

कट्टर शिवसैनिक ते बंडखोर नेते

पानटपरी चालवून उदरनिर्वाह करणारे गुलाबराव पाटील राज्याच्या मंत्रिमंडळात तिसऱ्यांदा मंत्री झाले आहेत. कट्टर शिवसैनिक असलेल्या गुलाबरावांना बंडखोरीनंतर कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. अगदी सर्वसामान्य घरातील गुलाबराव पाटील यांनी चरितार्थासाठी पाळधी येथे पानटपरी सुरू केली. त्यावेळी अमिताभ बच्चन यांचा नसीब चित्रपट जोरात सुरू होता. त्यावरून त्यांनी पानटपरीला ‘नसीब पान स्टॉल’असे नाव दिले.धडाकेबाज गुलाबराव पाटील हे शिवसेनेकडे वळले. मंत्रिपदासाठी त्यांना २०१४ ची वाट पहावी लागली होती.

परंडा ः विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेच्या शिंदे गटातील वजनदार आमदार प्रा. तानाजी सावंत यांची मंत्रिमंडळात वर्णी लागताच मतदारसंघांतील समर्थकांनी फटाके फोडून, गुलाल उधळत पेढे वाटून जल्लोष केला. राज्याच्या नव्या मंत्रिमंडळात आमदार प्रा. सावंत यांचे नाव निश्चित होताच समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. छत्रपती शिवाजी चौकात फटाके फोडून पेढे वाटण्यात आले. सोनारी (ता. परंडा) येथील भैरवनाथ साखर कारखान्यावरही जल्लोष साजरा करण्यात आला. गुलालाची उधळण करीत पावसात ढोल-ताशाच्या ठेक्यावर अनेकांनी ताल धरला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com