रोहित पवारांची अवस्था खरंच वाईट होईल? वाचा आणि ठरवा!

File photo of Rohit Pawar
File photo of Rohit Pawar

'तुम्ही कर्जत-जामखेडची चिंता सोडा.. ती जबाबदारी माझी आहे' असं सांगत डॉ. सुजय विखे पाटील यांनी येथून लढू इच्छिणार्‍या रोहित पवार यांनाच इशारा दिला.. 'रोहित यांची अवस्था पार्थ पवार यांच्यापेक्षाही वाईट करू', असे सुजय विखे पाटील म्हणाले.

आता विखे बोलले ते वरवरचं नाहीये. त्यांच्या वाक्याला अनेक संदर्भ आहेत.

त्यांचं हे वाक्य खरं का होऊ शकतं?

१) मंत्री, पालकमंत्री पदाचा फायदा
कर्जत-जामखेड या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राम शिंदे करतात. त्याच्या रुपाने मतदारसंघास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले आहे. त्याचा फायदा त्यांना आगामी निवडणुकीत होऊ शकतो.

२) भाजपला मानणारा मतदार वर्ग
गोपीनाथ मुंडे यांना मानणारा वंजारी आणि धनगर समाज येथे मोठ्या संख्येने आहे. तसेच मुंडे कुटुंबियाचे चौंडीशी भावनिक नाते आहे. शिंदे स्थानिक असल्याने ते त्या अनुषंगाने प्रचार करतील.

३) पंकजा मुंडे यांचा प्रचार
या मतदारसंघात गोपीनाथ मुंडे यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने पंकजा मुंडे यांच्या शब्दाला नागरिक महत्त्व देतात. त्यामुळे निवडणुकीत शिंदे यांना याचा चांगलाच फायदा होऊ शकतो.

४) आमदार सुरेश धस यांची भूमिका 
सुरेश धस हे माजी मंत्री आणि आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघात तीन वेळा आमदार होते. त्यामुळे या परिसरामध्ये त्यांची पकड आहे. एकुण काय तर येथील वातावरण आणि नागरिक भाजपच्या बाजूने आहेत.

५) रोहित पवार
रोहित पवार नवखे असून ते स्थानिक नाहीत. त्यांचा आणि आघाडीच्या स्थानिक कार्यकर्त्यांचे कितपत जुळते हे महत्वाचे आहे. कारण अनेक इच्छूकांना आपल्या आशा आकांशावर पाणी सोडावे लागेल. त्यामुळे ते कितपत काम करतील हे सांगणे कठीण आहे. याचा फायदा शिंदे घेऊ शकतात.

६) विखुरलेला विरोधी पक्ष
मतदारसंघात विरोधी पक्षाचा आवाज खूप कमी झालेला आहे. कार्यकर्ते निराश असून विरोधकांकडे स्थानिक सक्षम नेतृत्व नसणे हे शिंदे यांच्या पथ्यावर पडू शकते.

विखे पाटील यांचे हे वाक्य खोटं का होऊ शकतं?

१) सत्ताधाऱ्यांविरोधात नाराजी
शेतीमालाला नसलेला भाव, बेरोजगारी आणि दुष्काळ यामुळे नागरिकांचा सरकारविरोधी रोष. त्यामुळे लोकांना केंद्रात मोदी हवे होते पण, राज्यात युती नको आहे. त्याचा फटका बसू शकतो.

२) शिंदे यांच्या विरोधात जिल्ह्यात नाराजी
शिंदे गेली साडेचार वर्ष पालकमंत्री आहेत. मात्र, जिल्ह्यासाठी ठोस असे काही केलेले नाही. पदाचा फायदा घेत स्वतःच्या पक्षात घट पाडले. त्यामुळे जिल्हा भाजप किती जोमाने काम करेल हे सांगता येत नाही.

३) शिंदे यांच्यावर मतदारसंघातील नागरिक नाराज
शिंदे मंत्री आणि पालकमंत्री असूनही जामखेड भागात एमआयडीसी आणि कालव्याचे पाणी आले नाही किंवा त्यासंदर्भात काही काम झाले असेही नाही. गेल्या निवडणुकीत शिंदे यांनी या दोन मुद्यावर भर दिला होता. याचा फटका बसू शकतो.

४) पंकजा मुंडे यांचे खाते मिळाल्याचा तोटा
मुख्यमंत्र्यांनी पंकजा मुंडे यांचे जलसंधारण खाते काढून शिंदे यांना कॅबिनेट मंत्री पदी बढती देऊन जलसंधारण मंत्री केले. यातून गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे पंकजा यांच्याशी भावनिक नात्याने जोडला गेलेला मतदार नाराज झाला. पंकजाला सोडून हा माणूस मुख्यमंत्र्याच्या गोटात गेल्याने नागरिक ऐवढे नाराज झाले की सावरगाव घाट येथे भगवान बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमात त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या. जामखेड आणि कर्जतमध्ये त्यांना काळे झेंडे दाखविण्यात आले.  याचा जबर फटका त्यांना बसू शकतो.

५) पंकजा मुंडे यांचा प्रचार महत्त्वाचा
पंकजा मुंडे यांनी या मतदार संघात एकही सभा घेतली नाही तर मतदार योग्य तो बोध घेतील. यातून शिंदे यांचा हमखास पराभव होऊ शकेल.

६) रोहित पवार
तरुण, हुशार आणि तळमळ असलेला कार्यकर्ता अशी नागरिकांमध्ये भावना आहे. कारखान्याच्या माध्यमतून कार्यकर्त्यांचे जाळे उभारण्यास केलेली सुरूवात. पवार घराणे, शरद पवार यांच्या शब्दावर कार्यकर्ते काम करतील अशी अपेक्षा यामुळे रोहित पवार यांची बाजी मारण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाला जवळून पाहिलेले आहे. या मतदारसंघाचे माझ्या मते चित्र असे असेल..!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com