महाराष्ट्रात कॅनडाची तीन अब्ज डॉलरची गुंतवणूक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जानेवारी 2017

राज्यात विविध क्षेत्रांमध्ये कॅनडा गुंतवणूक करणार आहे. ओन्टारिओ टीचर्स पेन्शन योजना, सनलाइफ इन्शुरन्स कंपनी आणि फेअरफॅक्‍स या कंपन्या या गुंतवणुकीसाठी इच्छुक आहेत.

मुंबई - महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आता कॅनडाची मदत होणार आहे. राज्यातील दुष्काळी भागात पाणीपुरवठ्यासाठी जलवाहिन्यांचे जाळे, सर्वांसाठी घरे, वांद्रे-कुर्ला संकुलातील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र, स्मार्ट शहरे; तसेच माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीसाठी कॅनडातील पेन्शन फंडातील सुमारे तीन अब्ज डॉलरची गुंतवणूक केली जाणार आहे. याबाबत कॅनडाचे मंत्री अमरजित सोही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी (ता. 11) भेट घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज्यात विविध क्षेत्रांमध्ये कॅनडा गुंतवणूक करणार आहे. ओन्टारिओ टीचर्स पेन्शन योजना, सनलाइफ इन्शुरन्स कंपनी आणि फेअरफॅक्‍स या कंपन्या या गुंतवणुकीसाठी इच्छुक आहेत. ही केवळ सुरवात आहे, यानंतर आणखी मोठी गुंतवणूक केली जाईल, अशी माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली. उद्या, बुधवारी अमरजित सोही मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात भेट घेणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री फेब्रुवारीमध्ये कॅनडाला जाणार असल्याचेही सांगण्यात आले. राज्यातील सर्वांसाठी घर योजनेत ब्रुकफिल्ड ही कंपनी इच्छुक आहे. आपले तंत्रकौशल्य भारतातील बिल्डरांना देण्यास ते तयार आहेत. या तंत्रज्ञानामुळे दोन महिन्यांत इमारती उभारता येतील, अशीही माहिती जाणकारांनी दिली.

गेल्या वर्षी भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाल्यामुळे लातूरला रेल्वेने पाणी द्यावे लागले होते. अशी वेळ पुन्हा येऊ नये यासाठी दुष्काळी भागात जलवाहिन्यांचे जाळे या गुंतवणुकीतून उभारले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे भविष्यात दुष्काळ पडला तर जलवाहिन्यांच्या जाळ्यामुळे मराठवाड्यात केव्हाही कुठेही पाणी पोचवता येईल. तसेच औरंगाबादच्या वाळुंज येथील ऑटो क्‍लस्टरशी कॅनडातील ऑटो पुरवठादार सहकार्य करार करणार आहेत. या गुंतवणुकीपैकी काही भाग संरक्षणविषयक वाहनांच्या निर्मितीसाठीदेखील वापरण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

गुंतवणूक क्षेत्रे
पाणी योजना जाळे
सर्वांसाठी घर योजना
वांद्रे-कुर्ला संकुलातील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र
स्मार्ट शहरे
माहिती तंत्रज्ञान क्षेत्र

निधी पुरवणार...
ओन्टारिओ टीचर्स पेन्शन प्लान
सनलाइफ इन्शुरन्स कंपनी
फेअरफॅक्‍स

Web Title: Canada Investment in maharashtra