टीईटी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना बसतीय एसटी संपाची झळ | TET Exam | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

exam
टीईटी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना बसतीय एसटी संपाची झळ

टीईटी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना बसतीय एसटी संपाची झळ

sakal_logo
By
मीनाक्षी गुरव

पुणे - राज्यातील शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी आवश्यक असणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रविवारी (ता.२१) होत आहे. परंतु एसटीच्या संपामुळे ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची गैरसोय होत आहे. गावातून परीक्षा केंद्रावर येण्यासाठी खासगी वाहनांना दुप्पट प्रवासी भाडे द्यावे लागत असल्याने उमेदवारांच्या खिशाला कात्री लागत आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे टीईटी परीक्षा होते. दरवर्षी लाखो उमेदवार ही परीक्षा देतात. यंदा ही परीक्षा सातत्याने पुढे ढकलण्यात येत होती. आता अखेर रविवारी ही परीक्षा ळोत आहे. परंतु दरम्यान एसटीचा संप असल्यामुळे परीक्षेसाठी एका गावाहून दुसऱ्या ठिकाणच्या परीक्षा केंद्रावर जाणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. परिणामी परीक्षार्थी उमेदवारांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. एरवी एसटीचे अल्प दरातील तिकीट काढून उमेदवारांचा परीक्षा केंद्रापर्यंतचा प्रवास सहज झाला असता. परंतु, संपामुळे उमेदवारांना खासगी प्रवासी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. त्याशिवाय खासगी प्रवासी गाड्या वेळेवर मिळत नसल्याने अनेकांना आदल्यादिवशी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी मुक्कामाला यावे लागले. परिणामी मुक्काम खर्च, अवाजवी खासगी वाहन भाडे अशा अधिकच्या खर्चामुळे उमेदवारांचा खिशाला रिकामा होत आहे.

हेही वाचा: विद्युत विभागाकडून आरोग्य विभागाला हस्तांतरित केलेल्या निधीवर शंका

परीक्षेच्या ठिकाणी पोचण्यासाठी द्यावे लागले दुप्पट प्रवासी भाडे

‘नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील कबनूर गावात राहतो. परंतु टीईटी परीक्षेसाठी नांदेडला यावे लागले. या गावातून एसटीने आलो असतो, तर अवघ्या दीडशे रुपयांमध्ये प्रवास झाला असता. परंतु एसटी संपामुळे परीक्षा केंद्राच्या ठिकाणी आदल्यादिवशी यावे लागले. प्रवासासाठी दुप्पट भाडे द्यावे लागले, तसेच परीक्षेच्या आदल्यादिवशीचा मुक्काम खर्चही वाढला आहे.’

- श्रीकांत जाधव, उमेदवार (टीईटी परीक्षा)

‘मी उदगीरला राहतो आणि टीईटी परीक्षेसाठी लातूर शहरात आदल्या दिवशी यावे लागले. दरम्यान खासगी गाड्या वेळेवर न मिळाल्याने परीक्षेच्या आधीचा संपूर्ण दिवस वाया गेला. तसेच खासगी प्रवासी वाहनांनी तिकिटाचे दर दुप्पट, तिप्पट केला आहे. त्यामुळे अधिक खर्च करून यावे लागले.’’

- अक्षय काळे, उमेदवार (टीईटी परीक्षा)

एसटी संपामुळे टीईटी, नेट परीक्षा केंद्रावर पोचण्यात आलेल्या अडचणी, समस्या तसेच याबाबत आपल्याला काय वाटते, हे आपल्या नावासह पुढील व्हॉट्‌सॲप क्रमांकावर पाठवा. व्हॉटस्‌ॲप क्रमांक ८४८४९७३६०२

loading image
go to top