उमेदवारांना गुन्हेगारी पार्श्वभूमी प्रसिद्ध करावी लागणार 

विकास गाढवे 
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

लातूर : लोकसभा व विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना प्रचारासोबत गुन्हेगारी पार्श्वभूमीचा प्रचार प्रसारमाध्यमांना रोख जाहिरात देऊन करावा लागणार आहे. अशा उमेदवारांबाबत सर्वोच्च न्यायालयाने मागील महिन्यात घेतलेल्या कडक भूमिकेनंतर भारत निवडणूक आयोगाने उमेदवारांना त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी स्वतःहून प्रसिद्ध करण्याचे बंधन घातले आहे. त्यानुसार उमेदवारांना निवडणुकीच्या काळात तीन वेळा स्वतःवरील गुन्हे तसेच खटल्यांची माहिती प्रसार माध्यमांना जाहिरात देऊन प्रसिद्ध करावी लागणार आहे. यासोबत राजकीय पक्षांनाही त्यांच्या दागी उमेदवारांची माहिती वेबसाईटवर प्रसिद्ध करावी लागणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या मागील महिन्यात दिलेल्या निर्देशानुसार आयोगाने हे आदेश दिले आहेत. कलंकित उमेदवार व गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांना निवडणुक लढवण्यासाठी परवानगी देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने मागील महिन्यात कडक भूमिका घेतली होती. एखाद्या गुन्ह्यात दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा झालेल्या उमेदवारांना निवडणूक लढवण्यास बंदी आहे. निवडणून आल्यानंतरही शिक्षा झाल्यास त्याला पदावरून पाय उतार व्हावे लागते. या स्थितीत पाच किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष शिक्षेची तरतुद असलेल्या गुन्ह्यांत न्यायालयात आरोप निश्चित किंवा आरोपपत्र दाखल झालेल्या उमेदवारांना निवडणूकीसाठी बंदी घालावी, या मागणीच्या याचिकेवर मागील महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता.

एखाद्यावरील आरोप सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत त्याला दोषी ठरवणे चुकीचे असल्याचे स्पष्ट करून न्यायालयाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना राजकारणात येण्यापासून रोखण्यासाठी संसदेने कायदा करावा, असे सूचित केले होते. यासोबत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यावरील दाखल गुन्ह्यांची माहिती प्रतिज्ञापत्रात ठळक अक्षरात द्यावी, प्रसारमाध्यमांतही गुन्ह्यांची माहिती द्यावी, राजकीय पक्षांनी नेत्यांवरील आरोपांचा तपशील संकेतस्थळावर जाहिर करावा, आदी सूचनांही न्यायालयाने दिल्या होत्या. त्यानुसार आयोगाने हे आदेश काढल्याची माहिती उपजिल्हा निवडणुक अधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी दिली.

निवडणूक काळात तीन वेळात जाहिरात

निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर तसेच मतदानाला दोन दिवस उरले असताना तीन वेळा उमेदवारांना प्रसार माध्यमांतून त्यांचा गुन्हेगारी इतिहास जाहिरात स्वरूपात प्रसिद्ध करावा लागणार आहे. राजकीय पक्षांनाही याच पद्धतीने त्यांच्या कलंकित उमेदवारांची माहिती जाहिरात स्वरूपात प्रसार माध्यमांना द्यावी लागणार आहे. यासोबत  निवडणूक सांगेल त्या संकेतस्थळावर (वेबसाईटवर) उमेदवारांची यादी प्रसिद्ध करावी लागणार आहे.  यामुळे उमेदवारांना निवडणुक प्रचारासोबत आपल्या गुन्हेगारी वृत्तीचाही प्रसार करावा लागणार असल्याने त्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे.

Web Title: Candidates will have to release criminal background