esakal | अनिल देशमुख प्रकरण: CBI ने आपल्याच आधिकाऱ्याला केली अटक
sakal

बोलून बातमी शोधा

अनिल देशमुख प्रकरण: CBI ने आपल्याच आधिकाऱ्याला केली अटक

अनिल देशमुख प्रकरण: CBI ने आपल्याच आधिकाऱ्याला केली अटक

sakal_logo
By
नामदेव कुंभार

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील वसुली प्रकरणाच्या चौकशी अहवालात छेडछाड केल्याप्रकरणी सीबीआयने कारवाई सुरु केली आहे. याप्रकरणी सीबीआयने आपल्याच आधिकाऱ्याला अटक केली आहे. अभिषेक तिवारी असं त्या आधिकाऱ्याचं नाव आहे. इंडिया टुडेने याबाबतचं वृत्त दिलं आहे. याआधी बुधवारी रात्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयने ताब्यात घेतलं होतं. चतुर्वेदी यांची सीबीआयने 20 मिनिटं चौकशी करुन सुटका केली. अनिल देशमुख यांचे वकिल आनंद डागा यांनाही सीबीआयने ताब्यात घेतल्याची माहिती देण्यात आली होती.

२९ ऑगस्ट रोजी अनिल देशमुख यांना सीबीआयनं क्लीनचीट दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. सीबीआय चौकशीचा प्राथमिक अहवाल लीक झाल्यानं त्यावरुन बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. या चौकशी अहवालात असं म्हटलं होतं की, "अनिल देशमुख यांनी कुठलाही दखलपात्र गुन्हा केलेला नाही." यासंदर्भात क्लीनचीटच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर सीबीआयनं हे सर्व प्रकरण फेटाळत चौकशी सुरु केली होती. याप्रकरणाच्या चौकशीअंती हे दिसून आलं की, देशमुख यांच्या लीगल टीमने सीबीआयच्या काही कनिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न केला होता. या लाच प्रकरणात समावेश असलेल्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असंही सीबीआयनं म्हटलं होत. त्यानुसार, आज सकाळी सीबीआयने अभिषेक तिवारी यांना अटक केली आहे.

हेही वाचा: भय इथलं संपत नाय; कोरोनाचा आणखी एक व्हेरियंट, लसही अप्रभावी

इंडिया टुडेच्या सूत्रांनुसार, अभिषेक तिवारी सीबीआयचे उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी आहेत. अनिल देशमुख तपासाचा अहवाल लीक केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. अनिल देशमुख यांच्या जवळच्या लोकांकडून लाच घेतल्याचा त्यांचावर आरोप आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिषेक तिवारी अनिल देशमुख यांच्या वकिलाच्या संपर्कात होते. या प्रकरणीच अनिल देशमुख यांच्या वकिलांनाही ताब्यात घेतलेलं आहे. सीबीआयकडून चौकशी केली जात आहे.

हेही वाचा: विणाबद्दल अश्लिल शब्दांचा वापर, शिव ठाकरेने घडवली अद्दल

सीबीआयने अभिषेक तिवारी यांच्याविरोधात आणि एका वकिलाच्या विरोधात लाचप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. वकिलाची सध्या चौकशी सुरु असल्याची माहिती सीबीआयचे प्रवक्ते आर सी जोशी यांनी दिली. अभिषेक तिवारी यांच्याशी संबधित असलेल्या प्रयागराज आणि दिल्ली येथील ठिकाणीही सीबीआयद्वारे शोध घेण्यात येत असल्याचेही समजतेय.

loading image
go to top