Ethanol Production : राज्यातील साखर कारखान्यांचा इथेनॉल निर्मितीचा मार्ग मोकळा

केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीसाठी साखरेचा रस आणि सिरप वापरण्यास घातलेली बंदी शनिवारी (ता.१६) मागे घेतली.
Ethanol Project
Ethanol Projectsakal

पुणे - केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीसाठी साखरेचा रस आणि सिरप वापरण्यास घातलेली बंदी शनिवारी (ता.१६) मागे घेतली. केंद्राने ही बंदी मागे घेतल्याने आता इथेनॉल निर्मितीसाठी साखरेचा रस वापरण्यास साखर कारखान्यांना परवानगी मिळाली आहे. यामुळे राज्यातील सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांचा इथेनॉल निर्मितीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

केंद्र सरकारने दोनच आठवड्यापूर्वी इथेनॉलसाठी साखरेचा रस वापरण्यास बंदी घातली होती. यामुळे साखर कारखान्यांचे इथेनॉल निर्मिती प्रकल्प गोत्यात आले होते. परंतु याबाबत केंद्र सरकारला अवघ्या दोनच आठवड्यात नमते घ्यावे लागले आहे.

सन २०२३-२४ या वर्षात इथेनॉल निर्मितीसाठी साखरेचा वापर करण्यावर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. देशांतर्गत साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि साखरेचा पुरेसा पुरवठा राहावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्र सरकारने या बंदीबाबतच्या आदेशात नमूद केले होते. यासाठी साखर नियंत्रण कायदा १९६६ च्या कलम ४ आणि ५ चा आधार घेण्यात आला होता.

केंद्रीय अन्न पुरवठा मंत्रालयाने ७ डिसेंबर २०२३ रोजी हा बंदीचा निर्णय घेतला होता. मात्र साखर कारखाने आणि तेलनिर्मिती कंपन्यांनी याआधी केलेल्या कराराची पूर्तता करण्यासाठी 'बी-मोलॅसिस' चा वापर करून इथेनॉल बनविण्यास आता परवानगी देण्यात आलेली आहे.

या बंदीच्या निर्णयामुळे राज्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती प्रकल्पांसाठी केलेली गुंतवणूक आणि या प्रकल्पांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून घेतलेले अर्थसाहाय्यही पाण्यात गेल्याचे चित्र निर्माण झाले होते. यामुळे साखर कारखाने आर्थिक संकटात सापडण्याचा धोकाही निर्माण झाला होता. या सर्व मुद्यांचा विचार करत, केंद्र सरकारला हा निर्णय फिरवावा लागला आहे.

महाराष्ट्रातील सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी आपले लक्ष इथेनॉल निर्मिती प्रकल्पांकडे वळविले होते. यानुसार साखर कारखाने हे साखर उत्पादनापेक्षा इथेनॉल उत्पादनांवर अधिक भर देऊ लागले होते. यामुळे राज्यात १६३ इथेनॉल निर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाले होते. मात्र मध्येच केंद्राने इथेनॉल निर्मितीसाठी साखरेचा रस वापरण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याने अनेक साखर कारखानदार धास्तावले होते.

राज्यातील इथेनॉल निर्मिती प्रकल्प दृष्टीक्षेपात...

- राज्यातील एकूण इथेनॉल निर्मिती प्रकल्प --- १६३

- सहकारी साखर कारखान्यांचे प्रकल्प --- ५४

- खासगी साखर कारखान्यांचे प्रकल्प --- ७१

- स्वतंत्र (स्टँड अलोन) प्रकल्प --- ३८

- इथेनॉल निर्मिती प्रकल्पासाठी गुंतवणूक --- २१ हजार ३७१ कोटी

इथेनॉलची तीन वर्षातील मागणी व पुरवठा (लिटरमध्ये)

- वर्ष --- मागणी --- पुरवठा

- २०२०-२१ --- १०८ कोटी --- ९७ कोटी

- २०२१-२२ --- १२० कोटी --- १०२ कोटी

- २०२२-२३ --- १३२.३२ कोटी --- ४८.११ कोटी

- एकूण मागणी --- ३६०.३२ कोटी --- २४७.११ कोटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com