खलबतांचे यशस्वी सूत्रधार

मृणालिनी नानिवडेकर
बुधवार, 17 जुलै 2019

‘हा तर गुरूंचा आदेश’
‘१८ टक्‍के काम करण्याची क्षमता असेल तर २० टक्‍के जबाबदारीचे आव्हान स्वीकारावे, असे माझे अन्‌ बऱ्याच भाजप नेत्यांचे गुरू स्व. यशवंतराव केळकर सांगत असत. प्रदेशाध्यक्ष पद तसेच या पूर्वी आलेल्या जबाबदाऱ्या त्यांच्याच आदेशानुसार मी स्वीकारल्या. मोठे काम तुम्हाला अधिकच सक्रिय करते,’ अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी आपल्या नियुक्‍तीबद्दलची प्रतिक्रिया व्यक्‍त केली. ‘सकाळ’शी बोलताना ते म्हणाले, की संघटनेचे दहा लाख माणसे, त्यांचे २० लाख पाय, २० लाख हात तुम्हाला मदत करत असतात. २० लाख डोळे तुम्ही काय करताय ते बघतही असतात. मी विनम्रपणे सोपवलेली जबाबदारी स्वीकारतो आहे. जबाबदारी पार पाडण्याचे प्रयत्न आजवर जसे श्रम केले, तसेच करत राहीन.

मुंबई - सुमारे पाच वर्षांपूर्वी फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ यादीतले चंद्रकांत पाटील हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे असले, तरी ते भाजप किंबहुना संघपरिवारासाठी आपले होते. कोणत्याही कार्यकर्त्याच्या सुखदु:खात सहभागी होणारे, त्याला आपला मानत सदैव मदतीचा हात देणारे चंद्रकांतदादा हे शेकडो कार्यकर्त्यांचे हक्‍काचे स्थान आहेत. १९८० पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रिय असलेल्या चंद्रकांत पाटील यांचा २००३ मध्ये भाजपमध्ये प्रवेश झाला. ‘अभाविप’मध्ये राष्ट्रीय संघटनमंत्री असताना अमित शहा, धर्मेंद्र प्रधान यांच्याशी त्यांचा घनिष्ट संबंध आला. राज्यभरातील त्यांचा दांडगा संपर्क पाहून २००७ मध्ये त्यांना भाजपत महत्त्वाचे पद दिले गेले. मग आमदारकी, सरचिटणीसपद असे टप्पे पार करत ते आज प्रदेशाध्यक्ष झाले. मंत्रिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खालोखाल चंद्रकात पाटील यांना महत्त्व आहे. याशिवायही ते सगळ्याच जबाबदाऱ्या पार पाडतात. तीन महत्त्वाची खाती, एकनाथ खडसे यांच्या गच्छंतीनंतर महसूल खाते, तसेच पश्‍चिम महाराष्ट्रात निवडणूक व्यवस्थापनाची जबाबदारी अशी कामे ते करत गेले. 

मराठा आरक्षण प्रक्रिया तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना तर पडद्याआडच्या घडामोडींपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते या सर्वांशी चर्चेची जबाबदारी चंद्रकांत पाटलांनी पार पाडली. शिवसेनेशीही चर्चेचे पूल बांधण्यात फडणवीसांखालोखाल भूमिका त्यांनीच पार पाडली. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्याशी प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीबाबत सल्लामसलत करण्यात आली. ते प्रदेशाध्यक्ष होतील, पण त्यांची खाती जातील काय अशी विचारणाही सुरू झाली. ‘एक व्यक्‍ती एक पद’ या भाजपमधील सूत्राचा हवालाही दिला गेला. पण आज त्यांच्या नेमणुकीची घोषणा झाली आणि त्यांच्याकडील खातीही शाबूतच राहिली. आता विधानसभा निवडणुकीच्या व्यूहरचनेसाठी त्यांना फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसता येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrakant Patil BJP State President Politics