Chandrakant Patil I 'दाऊदशी व्यवहार करणाऱ्याला मंत्रिमंडळात ठेवलंय हे CM ठाकरे विसरले' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

politics

स्वतः महागाई कमी करण्यासाठीची जबाबदारी विसरून दुसऱ्याला सवाल विचारणे म्हणजे...

'दाऊदशी व्यवहार करणाऱ्याला मंत्रिमंडळात ठेवलंय हे CM ठाकरे विसरले'

मुंबईतील बीकेसी मैदानावर काल शिवसेनेच्या जाहीर सभेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. अनेक विषयांवरून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर आक्रमक टीक केली. दरम्यान, आता यावर पलटवार करत भाजपाचे चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे. दाऊदच्या टोळीशी व्यवहार करणाऱ्याला आपण मंत्रिमंडळात ठेवले आहे, हे सुद्धा मुख्यमंत्री ठाकरे विसरले आहेत. त्यांना मुख्यमंत्रीपदाचाच विसर पडल्याचे दिसले, असा टोमणा त्यांनी मारला आहे.

भाषण करताना राज्याच्या विकासाच्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलायचे मुख्यमंत्री ठाकरे विसरले, याची आठवण करुन देत चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपा दाऊदला मंत्री करेल, असा टोमणा उद्धव ठाकरे यांनी मारला. पण ते हे विसरून गेले की, दाऊद इब्राहिमच्या टोळीला आर्थिक मदत होईल अशा रितीने त्याच्या साथीदारांशी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप असलेला एक मंत्री त्यांच्या मंत्रिमंडळात आहे. या नेत्याला तुरुंगात जावे लागले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याला मंत्रिमंडळात कायम ठेवले आहे.

हेही वाचा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व नकली, सोमय्यांचा हल्लाबोल

महागाईबद्दल का बोलत नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केला. राज्यातील पेट्रोल डिझेलवरील कर कमी करा म्हणून पंतप्रधानांनी सांगितल्याचाही त्यांना राग आला. पण ते विसरले की, पेट्रोल, डिझेलवरील व्हॅटच्या दरात कपात करून ठाकरे सरकार महाराष्ट्रातील जनतेला महागाईपासून मोठा दिलासा देऊ शकते. स्वतः महागाई कमी करण्यासाठीची जबाबदारी विसरून दुसऱ्याला सवाल विचारणे म्हणजे मुख्यमंत्री असल्याचा विसर पडल्याचे लक्षण आहे, असंही पाटील म्हणाले आहेत.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, आपल्या सरकारमुळे मराठा समाजाचे असलेले आरक्षण गेले व ते पुन्हा मिळविण्यासाठी सरकार काहीच करत नाही, ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले, राज्यात पुन्हा लोडशेडिंग सुरू झाले, शेतकऱ्यांची वीज कनेक्शन मोठ्या प्रमाणात कापली, हजारो एकरांवर अजूनही ऊस तसाच उभा आहे आणि ऊसाचे गाळप होत नाही म्हणून शेतकऱ्याने आत्महत्या केली. विकासकामे म्हणून मुंबई महापालिकेने केलेले शाळांचे काम सांगणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आपण मुख्यमंत्री असल्याचा विसर पडलेला दिसला.

हेही वाचा: भाजप नेत्याची CM ठाकरेंवर आक्रमक टीका; सुपरडुपर फ्लॉप सभा

शिवसंपर्क अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत कोरोना काळ संपल्यानंतरची ठाकरे यांची ही पहिलीच जाहीर सभा होती. यात त्यांनी विरोधी पक्ष भाजप, भाजपचे नेते आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, मनसे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना निशाणा साधला. तसेच शिवसैनिकांना संबोधित करत मुंबई महापालिकेच्या प्रचाराचा नारळ देखील फोडला.

Web Title: Chandrakant Patil Criticized Cm Uddhav Thackeray On Meeting Of Shiv Sena In Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top