
'रोहित बाबा शरद पवारांनी ही संस्कृती...', चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर
पुणे : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते निदर्शने करण्यासाठी आले होते. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादीच्या (BJP-NCP Disputes) कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. यावरूनच आता दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहे. चंद्रकांत पाटलांनी रोहित पवारांच्या ट्विटला उत्तर देत राष्ट्रवादीची संस्कृती काढली आहे. (Chandrakant Patil Reply to Rohit Pawar)
हेही वाचा: NCP कार्यकर्त्यांना मारहाण, नाना पटोले म्हणतात, 'फडणवीसांनी कार्यकर्त्यांना...''
एका केंद्रीय महिला मंत्र्यांच्या पक्षकार्यक्रमात घुसून गोंधळ, अंडी फेकणं वगैरे वगैरे कुठल्या संस्कृतीत बसतं जरा सांगाल का? वयानं आणि अनुभवानं आमच्यापेक्षा ज्येष्ठ नेते असलेल्या शरद पवार यांनीच ही संस्कृती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये रुजवली की, त्यामागे दुसराच 'हात' आहे? असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आमदार रोहित पवारांना विचारला होता.
रोहित पवार नेमकं काय म्हणाले होते? -
महागाईवरून निशाणा साधत रोहित पवार म्हणतात, गॅस सिलिंडर ३५० रुपयांना मिळत असताना एकेकाळी रस्त्यावर उतरून महागाई विरोधात आंदोलन करणाऱ्या स्मृती ताईंच्या स्मृती जागृत करण्यासाठी निवेदन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना भाजपच्या पुरुष कार्यकर्त्यांकडून झालेली मारहाण अत्यंत निंदनीय आहे. भाजपने राजकारणाचा स्तर आधीच घालवला असून आता किमान महाराष्ट्राची संस्कृती तरी घालवू नये आणि या मारहाण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणी रोहित पवारांनी केली. तसेच आपण मोठे नेते आहाता. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांना समज द्याल आणि आवराल अशी अपेक्षा होती. पण आपणच अशा प्रवृत्तीला पाठबळ देण्याचा प्रयत्न करत असाल तर हे दुर्दैवी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला कधीही न शोभणारं आहे, असं रोहित पवार चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीसांना म्हणाले. त्यालाच आता चंद्रकांत पाटलांनी उत्तर दिलं आहे.
नेमकं प्रकरण काय? -
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरात एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात इराणी भाषण देण्यासाठी उठल्या त्यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली. त्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचे काही व्हिडिओ समोर आले होते. याप्रकरणी पुणे पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा देखील दाखल केला आहे.
Web Title: Chandrakant Patil Replied Rohit Pawar Over Ncp Woman Beaten By Bjp Party Worker
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..