चंद्रकांत पाटील म्हणतात, '...त्यांना माहिती नाहीये की, पाटील क्या चीज है!' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chandrkant Patil

चंद्रकांत पाटील म्हणतात, '...त्यांना माहिती नाहीये की, पाटील क्या चीज है!'

पुणे: चंद्रकांत पाटील यांच्यावर केंद्रीय नेतृत्व नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. याबाबतच आता त्यांनी पुण्यामध्ये स्पष्टीकरण दिलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी रोखठोक उत्तर देताना म्हटलंय की, केंद्रीय नेतृत्व माझ्यावर नाराज नाहीये. ज्या सुत्रांनी अथवा ज्यांनी कुणी तुम्हाला ही माहिती दिली आहे ते प्रकट करा. माझे श्रेष्ठी काय म्हणतात, ते पहायला मी समर्थ आहे. पुढे ते म्हणालेत की, गेले 42 वर्षे मी राजकारणात आहे. माझ्या कामगिरीवर केंद्रीय नेतृत्व पूर्णपणे समाधानी आहे. दिल्ली दौऱ्यामधील या अशा बातम्यांचे सूत्र आमच्याच पक्षातले असो वा बाहेरचे असोत. त्यांना माहिती नाहीये की, पाटील क्या चीज है...!

पुढे त्यांनी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याही वक्तव्यांचा आणि दाव्यांचा समाचार घेतला. नवाब मलिक यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याचा त्यांचा दावा हास्यास्पद असल्याचं त्यांनी म्हटलंय. ते म्हणाले की, पोलिस दल त्यांचंच आहे. गृहमंत्रीपदही त्यांच्याकडेच आहे. आज 28 नोव्हेंबरला राज्यातील आघाडी सरकारने दोन वर्षे पूर्ण केली आहेत. राज्य सरकारने दोन वर्षांत फक्त भ्रष्टाचारच केला असल्याचं ते म्हणाले. ही दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मी उद्धव ठाकरेंचं अभिनंदन करणार नाहीये, तर निषेध करणार आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

ठाकरे सरकारच्या द्विवर्षपूर्तीला निषेध

महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षाच्या कामगिरीवर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय की, ‘महाविकास आघाडी सरकारची अधोगती, सामान्य नागरिकांची झालेली ससेहोलपट हे गेले सात दिवस आम्ही मांडत आहोत. दोन वर्षांत विकासाची काम काहीच झालेली नाहीत, एकच धंदा सध्या जोरात सुरु आहे तो म्हणजे पैशाचा. या गेल्या दोन वर्षात न चुकता भ्रष्टाचार झाला आहे. ज्या पोलीस दलाचं नाव जगभरात घेतलं जातं त्यातील मुंबई पोलीस प्रमुखच गायब होते. 100 कोटी रुपये आणून देण्याचा आग्रह करत होते. अनेक दिवस राज्याचे गृहमंत्री परागंदा झाले होते. असा सगळा भ्रष्टाचाराचा विषय राज्यात सुरु असल्याचं ते म्हणाले.