गोंडवाना होणार नवे वनवृत्त, वाचा कोणकोणत्या वृत्ताचे होणार विभाजन

राजेश रामपूरकर
Wednesday, 4 November 2020

गतिमान प्रशासन, व्यवस्थापन आणि संरक्षणणार्थ वन विभाग व सामाजिक वनीकरण शाखेची पुनर्रचना करण्यात येणार आहे. अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक साईप्रकाश यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीने पुनर्रचनेचा प्रस्ताव तयार केलेला आहे.

नागपूर : वन विभाग आणि सामाजिक वनीकरणाची पुनर्रचना करण्यात येणार असून पुणे येथील सामाजिक वनीकरणाचे प्रधान मुख्य वनसंरक्षकांचे कार्यालय बंद करून हे कार्यालय नागपूर येथे हलविण्याचा प्रस्ताव आहे. चंद्रपूर वनवृत्त कार्यालय बंद करून चंद्रपूर आणि गडचिरोली या वृत्ताचे एकत्रिकरण करून गोंडवाना या नवीन वृत्ताची निर्मिती होणार आहे. औरंगाबाद वृत्ताचे विभाजन केले जाणार असून नांदेड हे नवीन वृत्त तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

हेही वाचा - वयोवृध्द वडिलांचे पालनपोषण न करणाऱ्या दाम्पत्यास न्यायालयाचा दणका; दंडासोबत सुनावली अनोखी शिक्षा 

गतिमान प्रशासन, व्यवस्थापन आणि संरक्षणणार्थ वन विभाग व सामाजिक वनीकरण शाखेची पुनर्रचना करण्यात येणार आहे. अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक साईप्रकाश यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीने पुनर्रचनेचा प्रस्ताव तयार केलेला आहे. त्यात जिल्ह्यातील एकूण तालुका, वनक्षेत्राचे प्रमाण, प्रादेशिक विभाग, सामाजिक वनीकरण विभाग यांना असलेल्या वनसंरक्षण, वनविकास, वनेत्तर जमिनीवरील वृक्षलागवडीसाठीचा वाव आहे. त्यामुळेच ३५ प्रादेशिक विभाग होणार असून त्याचे प्रमुख उपवनसंरक्षक दर्जाचे अधिकारी राहणार आहे. ज्या जिल्ह्यात वनेत्तर प्रमाण कमी आहे व वनेत्तर क्षेत्रावर वृक्षलागवडीसाठी जास्त वाव आहे, अशा सात जिल्ह्यात विभागीय वनाधिकारी आणि २२ जिल्ह्यात सामाजिक वनीकरण असे एकूण ६४ विभागस्तरावरील कार्यालये प्रस्तावित केले आहेत. 

चंद्रपूर आणि गडचिरोली वनवृत्ताचे एकत्रिकरण करण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल असल्याने कूप निष्कासनाची कामे, तेंदू पानाची तोड, वृक्षलागवड हेच उपजिविकेचे प्रमुख स्त्रोत आहे. पाच वन विभागात हा विभाग विभागलेला आहे. हा जिल्हा नक्षल प्रभावीत असून अवैध वृक्षतोडीचे प्रमाणही अधिक आहे. तसेच चंद्रपूर वृत्तामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश आहे. यात तीन विभाग आहेत. गडचिरोली वृत्तात सामाजिक वनीकरणाचे कार्यालय आहे. मात्र, या क्षेत्रात वृक्ष लागवीसाठी कमी वाव असल्याने येथील सामाजिक वनीकरणाचे कार्यालय बंद करण्यात येणार आहे. चंद्रपूर येथील सामाजिक वनीकरणाचे कार्यालय सुरू ठेवण्यात येणार असले तरी येथील प्रादेशिक वृत्त कार्यालय बंद होणार आहे. त्यामुळे येथील मुख्य वनसंरक्षक, विभागीय वनाधिकारी, सहाय्यक वनसंरक्षक, प्रशासकीय अधीक्षक ही पदे नवीन प्रस्तावित नांदेड वृत्तामध्ये वळती करण्यात येणार आहे. काही पदे ज्येष्ठतेनुसार गडचिरोली वनवृत्तात समाविष्ट केली जाणार आहेत. 

हेही वाचा - Success Story: तरुणीने फुलवला मशरूमचा मळा; कृषी...

मेळघाट प्रकल्पात विलीनीकरणाचा प्रस्ताव - 
अमरावती वनवृत्तातील मेळघाट, परतवाडा विभाग मेळघाट व्याघ्र प्रकल्पात विलीनीकरणाचा प्रस्ताव आहे. जारिदा व धारणी हे दोन्ही प्रादेशिक वन परिश्रेत्र व्याघ्र प्रकल्पात जातील. अकोला सामाजिक वनीकरणाचा समावेश अकोला प्रादेशिक विभागात विलीनीकरण केले जाणार आहे. औरंगाबाद वन वृत्ताचे विभागाजन होणार आहे. त्यात औरंगाबाद वनवृत्तात औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद जिल्ह्याचा समावेश राहणार आहे. नांदेड वनवृत्तात हिंगोली, नांदेड आणि परभणी या जिल्हयाचा समावेश राहणार आहे. या संदर्भात प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल) प्रमुख यांच्याशी संपर्क केला मात्र, संपर्क होऊ शकला नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chandrapur gadchiroli forest merge will formed news gondwana forest