
Rahul Gandhi Disqualified : भारत जोडो यात्रेची सांगता अखेर…; भाजप नेत्याचं खोचक ट्वीट
मोदी आडनावाच्या मानहानीप्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुरतमधील न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवले आणि २ वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. राहुल गांधींवर करण्यात आलेल्या या कारवाईवरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे यादरम्यान भाजपने मात्र भगवान के घर देर है, अंधेर नही अशी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याबद्दल खोचक ट्वीट केलं आहे. त्यांनी "भारत जोडो" यात्रेची सांगता अखेर "संसद छोडो"च्या रुपात झाली. भगवान के घर देर है, अंधेर नही! असे ट्वीट केलं आहे.
विरोधक आक्रमक
राहुल गांधी यांच्यावरील कारवाईनंतर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे म्हणाले की, चोराला चोर म्हणणं हा आपल्या देशात गुन्हा ठरला आहे. ही हुकूमशाहीच्या अंताची ही सुरुवात असून सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत. आता लढाईला दिशा द्यावी लागेल, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे.
हेही वाचा - एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!
सुरतमधील सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांना जामीनही दिला होता. तसेच राहुल गांधी यांना उच्च न्यायालयात अपिल करण्यासाठी 30 दिवसांची मुदतही दिली होती. मात्र, त्यापूर्वीच राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे.
राहुल गांधी केरळमधील वायनाडमधून लोकसभेचे खासदार होते. 2004 मध्ये ते पहिल्यांदा अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते आणि 2019 पर्यंत ते तिथले खासदार होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अमेठीची त्यांची पारंपारिक जागा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी विरोधात गमावली, परंतु वायनाडमधून निवडणूक जिंकून त्यांची संसद सदस्यत्व कायम ठेवलं.
मोदी आडनावावर वक्तव्य केल्याबद्दल काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणी राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व शुक्रवारी (24 मार्च) संपुष्टात आले. लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सुरत न्यायालयाने सुनावलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेनंतर वायनाडची त्यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
चोरों का सरनेम मोदी क्यो होता है… काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं हे विधान त्यांना भोवलं आहे. या मानहानीच्या खटल्यात सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्यांना जामीनही मंजूर केला आहे. या खटल्याच्या सुनावणीवेळी राहुल गांधी स्वत: कोर्टात उपस्थित होते.राहुल गांधी यांच्या विधानामुळे संपूर्ण मोदी समुदायाचा अपमान झाल्याचा दावा भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी केला होता. त्यांनी या प्रकरणी कोर्टात केस दाखल केली होती.