दृष्टिकोन बदला आणि नैराश्य टाळा!

अविनाश पाटील avinashpatil@gmail.com
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

नैराश्‍य बरे होण्यासाठी उपचार

 • मानसोपचार तज्ञांकडून औषधे घेणे.
 • मानसिक वर्तन थेरपी.
 • मानसिक संतुलन राखण्यासाठी जीवनशैलीत करायचे बदल.
 • योग्य आहार घेणे.
 • नियमित व्यायाम करणे.
 • स्वतःच्या दिनक्रमाची नोंदवही ठेवणे.
 • वेळेचे व कामाचे नियोजन करणे.
 • आपले छंद जोपासणे.
 • ध्यानधारणा व अध्यात्म

मला मे 2009 मध्ये पिटर्सबर्ग विद्यापीठाच्या बायोमेडिकल प्रोग्रॅमला ऍडमिशन मिळाल्याचा ई मेल मिळाला आणि माझा आनंद गगनात मावेनासा झाला. इतकी वर्ष उच्च शिक्षण मिळविण्यासाठी केलेल्या कष्टाला फळ मिळाल्याची समाधानाची भावना मनामध्ये होती. थोड्यच दिवसात मी लग्न करुन नंतर अमेरिकेच्या पेनस्लात्वेनिया राज्याच्या पिटर्सबर्ग शहरात दाखल झालो. भारतातून येताना मनावर प्रचंड ताण होता. मला इथे राहणे जमेल का? योग्य प्रकारे काम करता येईल का? नवीन समाजामध्ये स्थिरस्थावर होता येईल का? वगैरे.... वगैरे.....! काही महिन्यांनी माझी पत्नी, प्रियासुध्दा भारतातून पिटर्सबर्गला राहायला आली. आम्ही दोघेही खूप आनंदी आणि भविष्याबाबत खूप अपेक्षा ठेवून होतो. प्रत्येक दांपत्याची सुखाची व्याख्या वेगवेगळी असली तरी जीवनाच्या प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीतून मनाला समाधान व आनंद मिळावा, असे प्रत्येकाला वाटत असते. आम्हीही त्याला अपवाद नव्हतो.

आमचा संसार अतिशय सुखात चालला होता. पण माझे कामाच्या ठिकाणी मन लागत नव्हते. माझ्या मनाला आवडणारे काम ऑफिसमध्ये मिळाले नव्हते. त्यामुळे मी ऑफीसमध्ये खूप उदास असायचो. छोटी-छोटी कामे करतानाही मन रमत नसे. प्रत्येक नवीन गोष्ट करताना नकारार्थी भावना निर्माण होवू लागली. याचा परिणाम माझ्या मानसिकतेवर होवू लागला. मित्राशी बोलणे टाळणे, कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला जायचे टाळणे. या गोष्टी होवू लागल्या. घरी आल्यावर पत्नीसोबत रोजच किरकोळ कारणावरुन खटके उडू लागले. पुढे आमच्यातील वाद वाढतच गेले या साऱ्याचा परिणाम माझ्या पत्नीच्या मनावर खूप खोलवर झाला. तिला माझ्या वागण्याचा आणि बोलण्याचा प्रचंड त्रास होऊ लागला. या सर्व प्रकारामुळे मी मानसोपचारतज्ज्ञाकडे जाण्याचा निर्णय घेतला. मला नैराश्‍याने ग्रासले असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला. तसेच मला नैराश्‍य आटोक्‍यात आणण्याची औषधे सुरु केली. त्याच बरोबर Cognitive Behavior Therapy (सीबीटी) ही सुरु करण्यात आली.

नैराश्‍य हे नेहमी दबक्‍या पावलांनी येते. ते कधी येते याचा रुग्णाला थांगपत्ताही लागत नाही. नैराश्‍य येण्यात जनुके आणि तुमच्या भोवतालच्या वातावरणाचा होणारा आघात (Stress) यांचा महत्वाचा वाटा असतो. मनावर साचत गेलेल्या ताणाचा परिणामही नैराश्‍य येण्यास कारणीभूत ठरतो. नैराश्‍यामध्ये विचार करण्याची क्षमता हरवून जाते. मनामध्ये नेहमी नकारार्थी भावना येतात. स्वतःमधला आत्मविश्वास कमी होतो. जगातील बाह्य गोष्टी निरर्थक वाटतात. त्यामुळे रुग्ण समाजापासून अलिप्त राहु लागतो. अगदी आत्महत्या करण्यापर्यंत त्याची मजल जाते. ऑफीसमधील कामामध्ये अपयश येते. नातेसंबंध व मित्रमित्रैणी टिकविण्याचा प्रश्न उदभवतो. नैराश्‍य आलेली व्यक्ती अनेकदा बौद्विक काम करू शकत नाही. विचित्र वागण्याने नातेवाईक व मित्रमंडळी संबंध ठेवण्यास सहसा तयार होत नाहीत.

मी औषधोपचार वेळेवर घेत होतो आणि सीबीटीलाही नियमित जात होतो. पण अनेकदा औषधांचा परिणाम जाणवत नाही किंवा जाणवायला वेळ लागतो. दरम्यानच्या काळात माझी मानसिक स्थिती ढासळतच गेली. औषधांचा आणि सीबीटीचा काहीच उपयोग झाला नाही. नैराश्‍यामुळे मनामध्ये प्रचंड भिती वाटू लागली. या साऱ्याचा माझ्या पत्नीला प्रचंड त्रास झाला. माझे विचित्र वागणे, आमच्यात होणाऱ्या भांडणाला कंटाळून तिने युरोपला पुढील शिक्षणासाठी जाण्याचा निर्णय घेतला. ती मला माझ्या अश्‍या परिस्थितीत सोडून गेल्याने माझ्या मनामध्ये प्रचंड राग होता. ती गेल्यानंतर माझी स्थिती आणखीनच ढासळत गेली. रागाच्या भरात मी तिला घटस्फोटाची मागणी केली. तिने सहजासहजी घटस्फोट दिला. एवढी वर्ष आनंदाने केलेला संसार रागाच्या भरात घेतलेल्या एका चुकीच्या निर्णयाने क्षणात मोडला गेला.

मानसिक स्थिती चांगली नसताना आपण महत्वाचे निर्णय घेवू नयेत. कारण आपली निर्णय क्षमता कमी झालेली असते. पुढे एकटेपणामुळे माझे नैराश्‍य अधिकच वाढले. मला एकदा रुग्णालयात भरती करावे लागले. या काळात मला आत्महत्येच्या विचारांनी पूर्णपणे व्यापून टाकले होते. त्याचवेळी नवीन औषधे आणि Interpersonal Mood Rythem Therapy चालू करण्यात आली. याचा चांगला परिणाम माझ्यामध्ये जाणवू लागला. औषधे आणि मानसिक वर्तणूक समुपदेशनाच्या व्यतिरीक्त ही आणखी काही गोष्टीवर लक्ष्य दिले पाहिजे. नैराश्‍याच्या काळात योग्य आहार आणि व्यायाम करणे या गोष्टींना अनन्यसाधारण महत्व आहे. तेलकट, तिखट पदार्थ किंवा कार्बोनेटेड ड्रींक्‍स घ्यावी असे वाटते. त्यामुळे आपल्या चरबीत वाढ होण्याचा धोका असतो. आपल्या शरीराला जडत्व येण्याची शक्‍यता असते. व्यायामामुळे शरीराला तंदुरस्त राहण्यास मदत होते. शरीर तंदुरुस्त राहिल्यावर आपले मानसिक आरोग्य उत्तम व मन उत्साहित राहते. बागेमध्ये चालणे किंवा पळणे, सायकल चालवणे, पोहायला जाणे आदी व्यायाम नियमित करणे आवश्‍यक आहे. नैराश्‍यामध्ये अनेकदा रुग्णांची बौघ्दिक क्षमता कमी होते. लक्षात न राहणे, पूर्वीच्या माहितीवर लगेच निर्णय घेता न येणे, एखादे किचकट काम लक्ष देवून करता न येणे. या सर्वांवर उपाय म्हणजे काम करण्याचे नियम शिकून घेणे, वेळेचे नियोजन करणे व स्वतःची डायरी लिहीण्याची सवय ठेवणे. मनात येणाऱ्या नकारार्थी विचारांची, ते कोणत्या कारणाने आले त्याची नोंद ठेवणे, नकारार्थी विचाराने आपल्या इमोशनमध्ये काय फरक पडला व तो आपणे कसा आटोक्‍यात आणला याचीही नोंद ठेवावी.

औषधे आणि समुपदेशनामुळे माझी मानसिक वर्तणूक आणि स्थिती स्थिर झाल्यावर मी चिंतन आणि अध्यात्म या गोष्टीकडे वळलो. त्यातून एकप्रकारचे मानिसक सुख मला मिळू लागले. चिंतनाने आपणाला अंतरमनात डोकावण्याची संधी मिळते. त्या विश्वामध्ये आपले अस्तित्व किती बहुमूल्य आहे, याची प्रचिती येते. आपल्या रोजच्या दिनक्रमामध्ये थोडा तरी वेळ चिंतन, मनन आणि अध्यात्म या गोष्टींसाठी देण्याची गरज आहे.

मन हे चंचल आहे ते नेहमी वर्तमान काळात राहण्यापेक्षा भूतकाळात किंवा भविष्यकाळात जात असते. आज ही मनामध्ये भूतकाळातील केलेल्या चुकाबद्दल पश्‍चाताप होत आहे व भविष्याबद्दल चिंता वाटत असते. आपली पत्नी परत येईल का? आपला सुखी संसार परत सुरु होईल का? विद्यावाचस्तपती पूर्ण होईल का? नोकरी लागेल का? इतके प्रश्न मनामध्ये निर्माण होत असतात. औषधाने, समुपदेशन आणि ध्यानधारणा व अध्यात्म यांच्या मदतीने मी माझे मन शांत व आनंदी ठेवू शकलो. वरील सर्व गोष्टी काही दिवसात आत्मसात करता येत नाहीत. मला या गोष्टी समजण्यासाठी सुमारे सात वर्षे लागली. कोणताही चांगला फरक दिसण्यासाठी वेळ लागतो. त्या काळामध्ये रुग्णाने स्वतःवर विश्वास ठेवावा. नैराश्‍यामधून जात असताना आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन हा फार नकारार्थी असतो. आयुष्य किती सुंदर आहे, हेच आपण विसरुन जातो. एखाद्याला मानसिक समाधान व आनंद हा त्याच्या आंतरमनातून आला पाहिजे. आपण तो बाह्य गोष्टींवरुन घेण्याचा प्रयत्न केला तर तो क्षणभंगुर ठरतो. आयुष्यभर आपण आनंद कितीही बाह्य गोष्टींमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला तरी तो आपणाल मिळत नाही. मला हे समजल्यावर जीवनाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला आहे.

नैराश्‍य येण्याची कारणे.

 • जनुकिय
 • सभोवतालच्या परिस्थितीचे मनावर येणारे दडपण.
 • नैराश्‍यामध्ये येणारा अनुभव.
 • नकारार्थी विचार मनामध्ये येणे.
 • स्वतःमधला आत्मविश्वास गमावणे.
 • आत्महत्येचे विचार मनात येणे.
 • नैराश्‍यामुळे जीवनात निर्माण होणाया समस्या.
 • कार्यालयीन नुकसान.
 • नातेसंबंधातील बिघाड.
 • बौद्धिक क्षमता कमी होणे.

 

नैराश्‍य बरे होण्यासाठी उपचार

 • मानसोपचार तज्ञांकडून औषधे घेणे.
 • मानसिक वर्तन थेरपी.
 • मानसिक संतुलन राखण्यासाठी जीवनशैलीत करायचे बदल.
 • योग्य आहार घेणे.
 • नियमित व्यायाम करणे.
 • स्वतःच्या दिनक्रमाची नोंदवही ठेवणे.
 • वेळेचे व कामाचे नियोजन करणे.
 • आपले छंद जोपासणे.
 • ध्यानधारणा व अध्यात्म
Web Title: Change approach and avoid depression