इंधन कर कपातीचा अर्थव्यवस्थेला फटका 

इंधन कर कपातीचा अर्थव्यवस्थेला फटका 

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात करण्याच्या निर्णयाचा परिणाम राज्याच्या अर्थसंकल्पी अंदाजावर होणार आहे. राज्य सरकारने चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात 15 हजार 375 कोटी रुपयांची महसुली तूट अंदाजित केली आहे.

उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असताना सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी केले. त्यामुळे सरकारी तिजोरीला तीन हजार कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. परिणामी आर्थिक वर्षाच्या अखेरीस महसुली तुटीचा आकडा वाढून तो 20 हजार कोटींपर्यंत जाण्याची शक्‍यता अर्थ विभागातील सूत्रांनी वर्तविली आहे. 

इंधन दरवाढीने होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने पेट्रोलवरील व्हॅटमध्ये प्रतिलिटर अडीच रुपये, तर डिझेलवर 1 रुपया 56 पैसे अशी करसवलत दिली. त्यामुळे पेट्रोलवरील कर कपातीमुळे 1 हजार 250 कोटी, तर डिझेलमुळे 1 हजार 725 कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागणार आहे. अशावेळी तीन हजार कोटी रुपयांचा खड्डा कसा भरून काढायचा, असा प्रश्न अर्थ विभागाला पडला आहे.

वस्तू आणि सेवाकरातून अपेक्षित उत्पन्न वाढले नाही तर अर्थसंकल्पी तरतुदींना कात्री लावण्याशिवाय सरकारसमोर पर्याय राहणार नसल्याचे अर्थ विभागातील सूत्रांनी सांगितले. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 2018-19 चा अर्थसंकल्प मांडताना 2 लाख 85 हजार 968 कोटी रुपये इतका महसुली जमेचा अंदाज बांधला होता, तर महसुली खर्च 3 लाख 1 हजार 343 कोटी रुपये इतका अंदाजित करण्यात आला आहे.

अर्थसंकल्पात नमूद केलेली महसुली तूट आणि इंधन करसवलतीमुळे बुडणारे उत्पन्न लक्षात घेता वर्षाखेरीस महसुलीच्या तुटीचा आकडा 20 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे अर्थसंकल्पबाह्य घोषणांमुळे तुटीचा आकडा आणखी वाढू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.

नोटाबंदी आणि जीएसटीमुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेने अजून वेग पकडलेला नाही. जीएसटीतून कर संकलन वाढले तर सरकारला दिलासा मिळू शकतो. मात्र, तसे झाले नाही तर विविध खात्याच्या अर्थसंकल्पी तरतुदींना कात्री लागणे अपरिहार्य आहे. इंधन कर कपातीचे नुकसान भरून काढण्यासाठी मद्य किंवा तंबाखूजन्य पदार्थांवर कर लावण्याचा पर्याय सरकारसमोर असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

2018-19 च्या अर्थसंकल्पातील अंदाज (कोटी रुपयांत) 

  • महसुली जमा : 2 लाख 85 हजार 968 
  • महसुली खर्च : 3 लाख 1 हजार 343 
  • महसुली तूट : 15 हजार 375 
  • राज्यावरील कर्ज : 4 लाख 62 हजार 806 
  • इंधन कर सवलतीमुळे महसुलात तूट 
  • पेट्रोल : 1 हजार 250 कोटी रुपये 
  • डिझेल : 1 हजार 725 कोटी रुपये 
     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com