पीएमसीप्रकरणी ‘ईडी’कडून आरोपपत्र

pmcbank
pmcbank

मुंबई - पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बॅंक गैरव्यवहार प्रकरणात तीन हजार कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी सोमवारी (ता. १६) सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सात हजार पानांचे आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले.

पीएमसी बॅंकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस, हाउसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्‍चर लिमिटेडचे (एचडीआयएल) राकेश वाधवान व सारंग वाधवान; तसेच पीएमसी बॅंकेचे अध्यक्ष वरियाम सिंग यांच्या विरोधात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आतापर्यंत तीन हजार कोटी रुपयांची रक्कम फिरवून व्यवहारात आणण्यात आली. त्याचे परदेशी दुवेही ईडीच्या हाती लागले  आहेत.

रिझर्व्ह बॅंकेने नेमलेल्या प्रशासकाने आर्थिक गुन्हे शाखेकडे (ईओडब्ल्यू) सहा हजार ६७० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार केली होती. याप्रकरणी पीएमसी बॅंकेचा तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस याच्या जबाबाच्या आधारावर कर्ज देण्यात अनियमितता असल्याचे उघड झाले होते. ही अनियमितता २००८ नंतर दिसून आल्यामुळे तेव्हापासूनचे पुरावे गोळा करण्याचे मोठे आव्हान ईओडब्ल्यूपुढे होते. 

याप्रकरणी भारतीय दंड विधानातील कलम क्र. ४२० (फसवणूक), ४०६ (विश्‍वासघात), ४०९ (सरकारी अधिकाऱ्याकडून विश्‍वासघात), ४६५ (बनावटीकरण), ४६८ (फसवणुकीसाठी बनावटीकरण) व १२० (ब) (गुन्हेगारी कट रचणे) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. प्राथमिक तपासात मनी लाँडरिंगचे पुरावे मिळाल्यामुळे ईडीनेही गुन्हा दाखल केला. त्यानंतर ईडीने आरोपींचा ताबा घेतला  होता.

ईओडब्ल्यूचेही लवकरच आरोपपत्र 
रिझर्व्ह बॅंकेने नेमलेल्या प्रशासकाने केलेल्या तक्रारीनंतर भांडूप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. याप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) काम सुरू केले असून, आतापर्यंत १२ जणांना अटक झाली आहे. लवकरच आर्थिक गुन्हे शाखाही आरोपपत्र दाखल करणार आहे. पुढील आठवड्यात, २५ डिसेंबरनंतर आरोपपत्र दाखल केले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com