स्वस्त अल्पोपाहार प्रवाशांसाठी बेचवच

अशोक मुरूमकर - सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

मुंबई - मुंबई-पुणेसह राज्यातील इतर मार्गांवरील अधिकृत थांब्यांवर प्रवाशांची लूट होऊ नये म्हणून एसटी महामंडळाने 30 रुपयांत अल्पोपाहार आणि चहाची व्यवस्था केली. मात्र एसटी प्रशासनाच्याच दुर्लक्षामुळे हॉटेलचालकांकडून प्रवाशांची लूट सुरू आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील हॉटेलचालक 30 रुपयांत काय येते, असे म्हणत प्रवाशांना अपमानकारक वागणूक देत आहेत.

मुंबई - मुंबई-पुणेसह राज्यातील इतर मार्गांवरील अधिकृत थांब्यांवर प्रवाशांची लूट होऊ नये म्हणून एसटी महामंडळाने 30 रुपयांत अल्पोपाहार आणि चहाची व्यवस्था केली. मात्र एसटी प्रशासनाच्याच दुर्लक्षामुळे हॉटेलचालकांकडून प्रवाशांची लूट सुरू आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील हॉटेलचालक 30 रुपयांत काय येते, असे म्हणत प्रवाशांना अपमानकारक वागणूक देत आहेत.

एसटीच्या लांब पल्ल्याच्या गाड्या अल्पोपाहार किंवा जेवणासाठी हॉटेलवर थांबतात. हॉटेलचालक जादा दर आकारून प्रवाशांची लूट करतात. ही लूट थांबावी म्हणून एसटी प्रशासनाने जुलै 2016 पासून "महामंडळाची नाश्‍ता लूट थांबवणारी प्रवासी योजना' सुरू केली. त्यानुसार एसटी बस अल्पोपाहारासाठी अधिकृत थांब्यावर थांबतात. या थांब्यावर 30 रुपयांत शिरा, पोहे, उपमा, वडापाव, इडली, मेदूवडा यापैकी कोणताही एक पदार्थ व चहा देण्याची योजना आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर भिगवणजवळील एका हॉटेलचालकाला 30 रुपयांचा नाष्टा आहे का, असे विचारले असता त्याने 30 रुपयांत काय येते, असा प्रतिप्रश्‍न केला. हा एसटीचा अधिकृत थांबा आहे. मात्र नेमकी योजना काय आहे, हेच माहीत नसल्याचेही त्याने सांगितले.

उस्मानाबाद, लातूर, हैदराबाद, विजापूर, सोलापूर येथून पुणे, मुंबई, अलिबाग, ठाण्याकडे जाणाऱ्या बस येथे थांबतात. तेथे "30 रुपयांत नाश्‍ता व चहा' असा फलकही दिसत नाही. मुंबई-पुणे महामार्गावरील एका थांब्यावर 30 रुपयांचा अल्पोपाहार मागितला, त्या वेळी फक्त मेदूवडा व चहा असल्याचे सांगण्यात आले.

 

तक्रार क्रमांक नावापुरता

एसटी प्रशासनाने अल्पोपाहाराची योजना सुरू केल्यानंतर एखाद्या थांब्यावर हॉटेलचालकाने जादा पैसे आकारण्याचा प्रयत्न केल्यास त्याबाबत तक्रार करण्यासाठी 02223074439 हा क्रमांक दिला आहे. मात्र हा क्रमांक लागतच नाही, त्यामुळे तक्रार कोणाकडे करायची, असा प्रश्‍न प्रवाशांना पडत आहे. जादा दर आकारल्यास संबंधित थांबा त्वरित रद्द होऊ शकतो, असेही एसटीने म्हटले आहे.

एखाद्या अधिकृत थांब्यावर जादा दर आकारला व त्याची तक्रार आली तर संबंधित थांबा रद्द केला जाऊ शकतो. तक्रार क्रमांकावर राज्यभरातून कॉल येतात, त्यामुळे क्रमांक सतत "बिझी' लागत असावा. पुणे-सोलापूर महामार्गावर लूट होत असल्यास संबंधित विभाग नियंत्रकांशी बोलून चौकशी केली जाईल.
- वि. व. रत्नपारखी, महाव्यस्थापक, नियोजन व पणन (एसटी)

Web Title: Cheap snack for passengers