आनंद दिघे यांना जनतेनं धर्मवीर पदवी दिली असल्याचंही मुख्यमंत्री ठाकरेंनी सांगितलं.
धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या जीवनावर आधारीत धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे (Dharmveer) या चित्रपटाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि बॉलीवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) यांच्या हस्ते नुकताच ट्रेलर लाँच करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास एकनाथ शिंदे, शिवसेना खासदार संजय राऊत, अभिनेता सलमान खान, रितेश देशमुख यांच्या उपस्थितीत या चित्रपटाचा लाँचिंग सोहळा पार पडला. दरम्यान, अभिनेता सलमान खान यानं धर्मवीर आनंद दिघे आणि त्याच्यामध्ये असलेलं साम्य दाखवलं. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यातील तिसरं साम्य सांगितलं. आनंद दिघे यांना जनतेनं धर्मवीर पदवी दिली असल्याचंही त्यांनी सांगितलं.
यावेळी अभिनेता सलमान खान म्हणाला, नमस्कार, माझं नाव सलमान खान आहे, मला ट्रेलर फार आवडलं. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलत होतो, त्यावेळी त्यांनी आनंद दिघे यांच्याबद्दल एक गोष्ट सांगितली. आनंद दिघे एका बेडरुमध्ये राहत होते, मी पण एकाच बेडरुममध्ये राहतो. आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा झाली, त्यांनी सांगितलं की आनंद दिघे यांचं लग्न झालं नव्हतं, माझं पण लग्न झालेलं नाही. धर्मवीर चित्रपट खूप चालेलं, असं सलमान खान म्हणाला.
मुख्यमंत्री म्हणाले, तुम्ही दोघेही दबंग!
यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, गुरु आणि शिष्य असं नात जपणारा शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. शिवसेना संपवण्याचा ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला त्यांना संपवून आम्ही पुढं गेलो आहोत. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे एकमेकांसमोर आल्यानंतर राग निघून जायचा आणि प्रेम पाहायला मिळत होतं, असं म्हणत त्यांनी आठवणींना उजाळा दिला. सलमानभाई तुम्ही दोन साम्य सांगितली मात्र, तुम्ही दोघेही दबंग आहात. एक चित्रपटातील आणि एक जीवनातील दबंग होते, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
पुढे मुख्यमंत्री म्हणाले, आनंद दिघेंसारखी लाख मोलाची माणसं बाळासाहेब ठाकरेंना मिळाली. त्यांच्या मुशीतून तयार झालेले शिवसैनिक मला मिळाले. आनंद दिघे आपल्यातून गेले त्यावेळी त्यांचं वय ५० होतं. दिवस रात्रीचा हिशोब केला तर त्यांनी १०० वर्ष आयु्ष्य जगले. धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या नावात ठाणेकरांचं ह्रदय असा उल्लेख हवा. हा चित्रपट निष्ठा म्हणजे काय असतं ते दाखवणारा आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, या सोहळ्या उपस्थित असणारे एकनाथ शिंदे म्हणाले, माझी दोन लहान मुलं अपघातामध्ये गेली तेव्हा मी पूर्णपणे कोलमडलो होतो. मात्र, आनंद दिघे साहेबांनी मला त्या काळात प्रचंड आधार दिला. त्यांनी मला पु्न्हा शिवसेनेसाठी काम करण्यासाठी राजी केलं. त्यावेळी आनंद दिघे माझ्या पाठिशी ठामपणे उभे राहिले. मी आज तुमच्यासमोर जो काही बसलोय तो फक्त आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादामुळे आणि पाठबळामुळे आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.