
Chhagan Bhujbal : "उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदासाठी..." ; राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्याचा गौप्यस्फोट
शिवसेनेच्या नाव आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय लोकशाहीसाठी योग्य नसून आपण त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच सांगितले आहे. एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरे, असा वाद महाराष्ट्राच्या राजकारणात रंगला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रसचे नेते छगन भुजबळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर खुद्द उद्धव ठाकरे यांनीच शिंदे यांचेच नाव प्रथम मुख्यमंत्रीपदासाठी सुचविले होते, असे छगन भुजबळ म्हणाले.
उद्धव ठाकरे यांंनी शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांच्यासह तीन सुचवली होती. मात्र, महाविकास आघाडीत उर्वरीत दोन पक्षाकडे अनेक वर्षे सरकारमध्ये काम केलेले ज्येष्ठ नेते हेाते. त्यामुळे मुख्यमंत्रीपद हे उद्धव ठाकरे यांनीच स्वीकारावे, अशी विनंती महाविकास आघाडीकडून करण्यात आल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
तसेच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारावे, अशी भूमिका शरद पवार यांनी स्वतः मांडली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासह इतर दोन नावे मागे पडली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.