चिकन, अंडी महागणार वाहतूकदारांच्या संपाचा फटका 

चिकन, अंडी महागणार वाहतूकदारांच्या संपाचा फटका 

मुंबई - वाहतूकदारांच्या देशव्यापी संपाचा मोठा फटका पोल्ट्री ब्रॉयलर, लेअर आणि पोल्ट्री खाद्य वाहतुकीला बसला आहे. संप लांबला, तर उत्पादन थांबून तुटवडा होईल, पर्यायाने चिकन आणि अंडी महागतील, अशी शक्‍यता आहे. 

"ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कॉंग्रेस' संघटनेच्या नेतृत्वाखाली माल वाहतूकदारांनी पुकारलेल्या देशव्यापी चक्का जाम आंदोलनाचा फटका मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी दिसत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती "जीएसटी'अंतर्गत आणा, इंधन दरांची सातत्याने होणारी वाढ थांबवा, टोलदरातून सवलत द्या, आदी मागण्यांसाठी हा देशव्यापी संप पुकारला आहे. पोल्ट्री खाद्यासाठी लागणाऱ्या सोया ढेपेच्या गाड्या फिडमिलपर्यंत पोचू न शकल्यामुळे मोठ्या प्रमाणात खाद्यटंचाई निर्माण झाल्याचे पोल्ट्री अभ्यासक दीपक चव्हाण यांनी "सकाळ'ला सांगितले. संपाचा सुरवातीचे चार दिवस फटका बसला नाही; मात्र नंतर पोल्ट्री ब्रॉयलर, लेअर आणि पोल्ट्री खाद्य वाहतूक बंद झाल्याने खाद्यनिर्मिती कारखाने बंद पडले आहेत. 

पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि सांगली हे महाराष्ट्रातील पोल्ट्रीचे प्रमुख विभाग आहेत. पुणे व सांगली विभागात बाहेरील जिल्ह्यांतून मक्‍याची आवक होते. सोया ढेपेसाठी धुळे आणि इंदूर बाजारावर पोल्ट्री उद्योग अवलंबून आहे. पोल्ट्री, पशुखाद्य आणि तेलबिया गाळपाशी संबंधित सर्व संघटनांनी तातडीने सरकारशी बोलून संपावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे नाशिकस्थित पोल्ट्री उद्योजक डॉ. अनिल फडके यांनी सांगितले. धुळे येथील महाराष्ट्र ऑईल एक्‍स्ट्रॅक्‍शन प्रा. लि. चे मनोज अग्रवाल म्हणाले, की संपामुळे आता सोया ढेपेचा अतिरिक्त साठा निर्माण होत आहे. तो ठेवण्यासाठी जागा नाही. यामुळे गाळप प्रकल्प बंद आहे. 

पोल्ट्री उद्योग दृष्टिक्षेपात 
10 हजार  - पोल्ट्रीधारक कुटुंबे थेट अवलंबून 

5 लाख  - मका-सोयाबीन उत्पादकांना रोजगार 

4 कोटी  - दरमहा ब्रॉयलर्स उत्पादन 

1 कोटी  - दररोज अंडी उत्पादन 

7, 500 कोटी  -वार्षिक ब्रॉयलर्स उद्योग 

सोया ढेपेची पोच मिळण्यास दोन दिवस, त्यानंतर खाद्य तयार होण्याच्या प्रक्रियेत दोन दिवस आणि ते खाद्य पोल्ट्री फार्ममध्ये पोचवण्यासाठी एक दिवस, अशी पाच-सहा दिवसांची प्रक्रिया असते. वाहतूकदारांच्या संपामुळे हे चक्र ठप्प झाले आहे. 
- राजेंद्र थोरात, चेअरमन, ओम चिक्‍स इंडिया कंपनी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com