राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना मारहाण
औरंगाबादः राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना आज (सोमवार) दुपारी तीनच्या सुमारास भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला.
औरंगाबादः राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना आज (सोमवार) दुपारी तीनच्या सुमारास भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला.
आज सकाळी 11 वाजता विभागीय माहिती कार्यालयाला भेट दिल्यानंतर दुपारी गायकवाड आपल्या पत्नीसह सुभेदारी विश्रामगृहात थांबले होते. दुपारी तीनच्या सुमारास भारिपचे जिल्हाध्यक्ष अमित भुईगळ यांच्यासह 7-8 कार्यकर्त्यांनी त्यांच्या खोलीत प्रवेश करत त्यांना मारहाण केली. मारहाण करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्या विरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईच्या दादर येथील आंबेडकर भवन पाडल्याच्या रागातून ही मारहाण करण्यात आल्याचे समजते.
मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड हे पत्नीसह सोमवारी औरंगाबादेत आले होते. सकाळी विभागीय माहिती कार्यालयाला भेट दिल्यानंतर ते सुभेदारी विश्रामगृहात विश्रांतीसाठी थांबले होते. त्याचवेळी भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमित भुईगळ हे कार्यकर्त्यासह सुभेदारीत आले आणि त्यांनी थेट गायकवाडांच्या कक्षात प्रवेश करत त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे पोलिसांनी कक्षाकडे धाव घेतली आणि भुईगळसह इतर कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतले. मुख्य आयुक्तांना मारहाण झाल्याचे कळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी सुभेदारीवर दाखल झाले. या प्रकरणी पोलिसांनी अमित भुईगळ, दिनेश साळवे, शांता धुळे, रेखा उदगीरे, गौतम गवळी आदी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरूध्द बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.