

solapur
sakal
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवलेल्या भारतीय जनता पक्षाचा विजयी मेळावा व कृतज्ञता सोहळा येथे मंगळवारी (ता. २८) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजिला आहे. त्यासाठी २५ हजार लोक बसू शकतील, इतका जर्मन हँगर मंडप उभारला आहे. आमदार देवेंद्र कोठे यांनी कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी केली.
मंगळवारी (ता. २८) दुपारी १२ वाजता हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर मुख्यमंत्री फडणवीस, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ‘न भूतो...’ यश मिळवून देणारे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. याप्रसंगी नगरपंचायत-नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीत विजयी सदस्यांसह नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार होणार आहे.
सोलापूर शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी १,३७८ कोटी निधीसह विविध विकासकामांना मंजुरी देऊन निवडणुकांमध्ये दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी रात्री उशिरापर्यंत तयारी सुरू होती.
३६० सदस्य, पदाधिकारी एका मंचावर
हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर १०० बाय ३०० चौरस फुटांचे तीन मंडप उभारण्यात आले आहेत. मुख्य सोहळ्यासाठी मध्यभागातील मंडपात ४० बाय ६० चौरस फुटाचा मंच उभारण्यात आला आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थांतील ३६० सदस्य व पदाधिकारी बसू शकतील, असा भव्य मंच उभारण्यात आला आहे.
आमदार कोठेंसह पदाधिकाऱ्यांची पाहणी
आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, सरचिटणीस विकास वाघमारे, नगरसेवक गणेश वानकर आदी पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. आमदार कोठे यांनी तयारीच्या अनुषंगाने सूचना दिल्या.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचीही पाहणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्याच्या अनुषंगाने पोलिस उपायुक्त विजय कबाडे, गौहर हसन, सदर बझार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर आदींननी कार्यक्रमस्थळी भेट दिली. बंदोबस्त व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
व्हीआयपींसाठी ५०० सोफे
या सोहळ्यानिमित्त भाजपचे शहर-जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासाठी ५०० सोफ्यांची सोय करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकरिता पक्षाचे चिन्ह कमळ असलेले ५०० शेलेही मागविण्यात आले आहेत.
कुलरसह एसी, पाण्याची सोय
हा सोहळा दुपारी १२ वाजता होणार आहे. सोमवारी शहरातील तापमान ४३.९ अंश सेल्सिअस इतके होते. मंगळवारीही त्याच्या जवळपास तापमान राहण्याचा अंदाज आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर ६० कुलर, ४० पंखे व चार टनचे सहा वातानुकुलित यंत्रणा (एसी) बसविण्यात आले आहेत. तसेच पाण्याच्या जारसह सुमारे ३० हजार बाटल्या पाण्याची सोय करण्यात आली आहे.
सोहळ्याच्या तयारीवर एक दृष्टिक्षेप
२५ हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार
१०० बाय ३०० चौरस फुटाचे तीन जर्मन हँगर मंडप
४० बाय ६० चौरस फुटाचा मुख्य मंच
३६० सदस्य बसू शकतील इतक्या भव्य मंचाची उभारणी
२५ हजार खुर्च्यांची व्यवस्था
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.