खडसे म्हणतायत.. 'आमचं ठरलंय.. तुमचं काय ते सांगा!'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जून 2019

सत्ताधारी पक्षात आहे हे विसरतो
मी कधी कधी सत्ताधारी पक्षात आहे हे विसरून जातो. विरोधी पक्षनेत्याचे गुण अजून गेलेले नाहीत. मुख्यमंत्र्यांना कधी कधी वाटत असेल की, मी विरोधी पक्षात जातो की काय. पण, मी विखे पाटलांचा आदर्श ठेवणार नाही. मी विरोधी पक्षात जायचे असते, तर आधीच पक्षांतर केले असते, असे सांगत पुन्हा एकदा विखेंना टोला लगावला.

मुंबई - ‘मुख्यमंत्री आणि मी काय करायचं ते ठरलंय. पण, मुख्यमंत्रिपदाबाबत तुमचं आणि भाजपचं काय ठरलंय, ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अगोदर जाहीर करायला सांगा. म्हणजे, युतीत मुख्यमंत्रिपदाचा वाद होणार नाही,’ अशा शब्दांत भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी आज शिवसेना आमदारांची फिरकी घेतली.

विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांची निवड झाली. त्यावरील अभिनंदन प्रस्तावावर ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या प्रस्तावावर बोलताना खडसे यांनी स्वपक्षातील नेत्यांसह राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावरही टोलेबाजी केली. खडसे म्हणाले की, मी मंत्रिपदासाठी आग्रही नव्हतो. मात्र, पुढचे सरकार आमचेच येणार आहे. तेव्हा मुख्यमंत्री व मी काय करायचं, ते आमचं ठरलंय. यावर ‘काय ठरलंय, ते सांगा,’ अशी विरोधकांनी मागणी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chief minister shivsena bjp Eknath Khadse Politics