मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा स्थगितच; पूरपरिस्थिती नियंत्रणावर भर

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा स्थगितच; पूरपरिस्थिती नियंत्रणावर भर

धुळे ः महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा धुळ्यातील 8 ऑगस्टचा नियोजित दौरा एक दिवसाने पुढे ढकलला आहे. मुख्यमंत्री फडणवीस फडणवीस 9 ऑगस्टला सकाळी नऊला धुळ्यात येतील अशी माहिती माजी संरक्षण राज्यमंत्री तथा खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी आज येथे दिली.

मुख्यमंत्री फडणवीस महाजनादेश यात्रेवर आहेत. 6 ऑगस्टला ही यात्रा जळगाव जिल्ह्यात आली मात्र राज्यातील विशेषतः पश्‍चिम महाराष्ट्रातील पूर परिस्थितीमुळे ही यात्रा स्थगित करून श्री. फडणवीस कॅबिनेट बैठकीसाठी रवाना झाले. पूरस्थितीची पाहणी व आढाव्यानंतर महाजनादेश यात्रेला पुन्हा सुरवात होत आहे. या सुधारित दौऱ्याच्या अनुषंगाने डॉ. भामरे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. भाजपचे धुळे ग्रामीणचे प्रभारी श्री. सावजी, महापौर चंद्रकांत सोनार, भाजपचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, हिरामण गवळी, प्रा. अरविंद जाधव, युवराज पाटील, विजय पाच्छापुरकर आदी उपस्थित होते.

सुधारित दौरा असा
मुख्यमंत्री फडणवीस यांचे 9 ऑगस्टला सकाळी नऊला गोंदूर विमानतळावर आगमन होईल. तेथून ते शहरात आल्यानंतर मनोहर थिएटरजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून महाजनादेश यात्रेची रॅली सुरू होईल. आग्रारोडमार्गे महात्मा गांधी पुतळा- देवपूर- नगावबारी अशी ही यात्रा जाईल. तेथून पुढे धुळे तालुक्‍यात यात्रेचा प्रवास सुरू होईल. यात नगाव-सरवड फाटा- सोनगीर येथे यात्रेचे स्वागत होईल. त्यानंतर नरडाणामार्गे यात्रा शिंदखेडा तालुक्‍यात जाईल. शिंदखेडा येथे यात्रेचे स्वागत होईल. तेथून यात्रा दोंडाईचात जाईल. तेथे दुपारी साडेबाराला श्री. फडणवीस यांची जाहीर सभा होईल. तेथून पुढे ही यात्रा नंदूरबार जिल्ह्यात रवाना होईल.

स्वागतासाठी यावे
महापालिका निवडणुकीदरम्यान भाजपला सत्ता दिल्यास धुळे शहरासाठी पाचशे कोटींचा निधी देण्याचे फडणवीस यांनी आश्‍वासन दिले होते. महापालिकेवर सत्ता आल्यानंतर अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेसाठी 176 कोटी, नगरोत्थान योजनेंतर्गत रस्त्यांसाठी 100 कोटी, भूमिगत गटार योजनेसाठी 150 कोटी निधी दिला. धुळे शहरासाठी दिलेल्या या निधीच्या पार्श्‍वभूमीवर श्री. फडणवीस यांचे स्वागत व कौतुकासाठी शहर, जिल्ह्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन पक्षातर्फे डॉ. भामरे यांनी केले.

पक्ष प्रवेशाबाबत माहिती नाही
जिल्ह्यातील कोणते नेते भाजपमध्ये दाखल होणार आहेत असा प्रश्‍न पत्रकारांनी विचारला असता डॉ. भामरे यांनी याबाबत आपल्याला माहिती नाही, सूचना नाही. पक्ष प्रवेशाबाबतचा विषय पक्षश्रेष्ठींच्या पातळीवरचा असल्याचे म्हणत डॉ. भामरेंसह उपस्थित पदाधिकाऱ्यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com