"गलवानमध्ये घुसून चिन्यांचं सैनिकी संचलन, PM मोदी प्रचारात व्यस्त" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Saamana
"गलवानमध्ये घुसून चिन्यांचं सैनिकी संचलन, PM मोदी प्रचारात व्यस्त" | Saamana

"गलवानमध्ये घुसून चिन्यांचं सैनिकी संचलन, PM मोदी प्रचारात व्यस्त"

भारत-चीन (India China) सीमेवरील गलवान व्हॅली या भारताच्या हद्दीतील परीसरात चीनने त्यांचा राष्ट्रध्वज फडकावल्याचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोवरून पुन्हा एकदा भारच-चीन वाद उफाळण्याची शक्यता आहे. मात्र केंद्र सरकारकडून (Central Government of India) याबद्दल आणखी कुठलंही भाष्य करण्यात आलेलं नाही, त्यामुळे या मुद्दयावरून आता विरोधकांनी सरकारला मौन तोडण्याचं आवाहन केल्याचं पाहायला मिळतंय. सामनाच्या (Saamana) अग्रलेखातून आज पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीकास्त्र उगारण्यात आलंय. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत ते त्यांचा झेंडा फडकवण्यात व्यस्त आहेत, मात्र गलवान व्हीलीतील चीनचा झेंडा उतरवून तिथे भारताचा झेंडा कधी फडकावणार यावर बोला म्हणत सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्र सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.

हेही वाचा: राष्ट्रीय सुरक्षेचा केंद्राकडून खेळखंडोबा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचं मंत्रीमंडळ हे नेहमीप्रमाणे विधानसभा निवडणुकांच्या तयारीत व्यस्त आहेत. मात्र एकीकडे ते पाच राज्यांत भाजपचा ध्वज फडकवण्याच्या तयारीत असताना तिकडे पुर्व लडाखमध्ये चीन्यांनी त्यांचा ध्वज फडकावला आहे, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार काय बोलणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. भारताच्या हद्दीत घुसून चिन्यांनी फक्त ध्वज फडकावला नाही, तर ध्वजारोहन करतानाचा व्हिडीओ प्रसारीत केलं, तिथे त्यांच्या सैन्याने संचलन केलं, त्यांचं राष्ट्रगीत गायलं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने चीनच्या या आक्रमनावर साधे शाब्दिक आक्रमणही केलं नाही अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

'सामना'मध्ये काय म्हटलंय?

पंतप्रधान मोदींसह त्यांचे अर्धे मंत्रिमंडळ नेहमीप्रमाणेच विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात दंग झाले आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील निवडणुका जिंकून भाजपचा झेंडा फडकवायचा यासाठी मोदी व त्यांच्या कॅबिनेटने शर्थ चालवली आहे, पण याच काळात पूर्व लडाखजवळील गलवान व्हॅलीत लाल चिनी घुसले असून नववर्षदिनी चिन्यांनी त्यांचा राष्ट्रध्वज गलवान खोऱ्यात फडकवून हिंदुस्थानच्या सार्वभौमत्वास आव्हान दिले आहे. चीन सरकारने हिंदुस्थानच्या हद्दीत फक्त त्यांचा झेंडाच फडकविला असे नाही, तर या ध्वजारोहण सोहळय़ाचे संपूर्ण चित्रीकरण करून तो व्हिडीओ अधिकृतपणे प्रसारित केला आहे. गलवान व्हॅलीत घुसून चिन्यांनी सैनिकी संचलन केले. ध्वज फडकविला, त्यांचे राष्ट्रगीत गायले. व्हॅलीत फलकही लावले की, ‘आम्ही आमची एक इंच भूमीही सोडणार नाही.’ हे सरळ सरळ आव्हान आणि चिथावणीच आहे. पंतप्रधान मोदी किंवा त्यांच्या सरकारातील प्रमुख लोकांनी चिन्यांच्या या घुसखोरीवर साधे शाब्दिक आक्रमणही केले नाही. भाजपच्या आय.टी., सायबर फौजाही या प्रश्नी शरणागतीचे पांढरे निशाण फडकवून बसल्या आहेत. गलवान व्हॅलीत चिनी घुसले व त्यांनी त्यांचा झेंडा फडकविला ही बाब मोदी सरकारला, भारतीय जनता पक्षाला गंभीर वाटू नये? 5 मे 2020 रोजी याच व्हॅलीत आपल्या सैनिकांची चिन्यांबरोबर रक्तरंजित झटापट झाली होती. त्यात आमचे वीसेक सैनिक शहीद झाले. गलवान व्हॅली हिंदुस्थानी सैनिकांच्या रक्ताने भिजली. त्या सर्व शहीद सैनिकांच्या शौर्याचा सन्मान हिंदुस्थान सरकारने केला, पण वर्षभरातच चिनी सैनिक त्याच प्रदेशात आक्रमण करून घुसले व देशाच्या राजधानीत साधी सळसळही झाली नाही. उत्तर प्रदेशातील एका अत्तर व्यापाऱ्याकडे आयकर विभागाने धाडी घालून शे-दोनशे कोटी रुपये पकडले. त्यावर पंतप्रधान व त्यांचे सहकारी जाहीर सभांतून भाषणे ठोकतात, पण गलवान व्हॅलीत चिन्यांनी झेंडा फडकविला यावर बोलत नाहीत.

हेही वाचा: पंतप्रधान म्हणाले शेतकरी माझ्यासाठी मेले का : सत्यपाल मलिक

पंतप्रधान व त्यांचे सहकारी विरोधकांना संपविण्याची व पराभूत करण्याची भाषा जोरकसपणे करतात, पण घुसलेल्या चिन्यांचे ते नाव घेत नाहीत. चिन्यांना धडा शिकवायचे ते बोलत नाहीत. राजकीय विरोधकांचे काय करायचे ते नंतर पाहता येईल, पण चीनसारख्या देशाच्या दुष्मनांकडे आधी पाहायला हवे. चीनची घुसखोरी लडाखच्या गलवान व्हॅलीपुरतीच मर्यादित नाही. अरुणाचल, उत्तराखंड, सिक्कीम प्रांतातही चीन घुसखोरी करीत आहे. अरुणाचल प्रदेशातील 15 ठिकाणांची नावे चीनच्या नकाशावर परस्पर बदलून चिन्यांनी आपली कळ काढली आहे, पण पाकडय़ांची कळ जेवढी जोरात लागते तेवढी चिन्यांची लागत नाही. याचे कारण असे की, पाकिस्तानशी संघर्ष केला की हिंदुस्थानात निवडणुकीच्या तोंडावर हिंदू-मुसलमान असा झगडा पेटवता येतो. दुसरे म्हणजे पाकिस्तान हा एक कमजोर, तितकाच विस्कळीत देश आहे. त्यामुळे पाकडय़ांना दम भरणे, डोळे वटारणे, एखादा सर्जिकल स्टाईक करून शौर्य गाजविण्याचा आव आणणे सोपे असते. चीनच्या बाबतीत ते सोपे नाही. चीन ही एक स्वयंभू महासत्ता आहे. रशिया, अमेरिकेपेक्षा ती चार पावले पुढे आहे. आशिया खंडातील अनेक राष्ट्रे चीनने आर्थिक व लष्करी बळाने गिळली आहेत. त्यामुळे चीनने कितीही घुसखोरी केली तरी लालभाईंच्या बाबतीत हिंदुस्थान संयम आणि सबुरीनेच घेणार आहे. चीनने आपल्या वीस सैनिकांचे बळी घेतले तरी उद्या पुन्हा एकदा चीनचे राष्ट्राध्यक्ष अहमदाबादेत येऊन आमच्या पंतप्रधानांबरोबर झोपाळय़ावर झुलताना व फाफडा, ढोकळा खाताना दिसतील; कारण चीन हे एक सामर्थ्य आहे.

हेही वाचा: प्रियंका गांधी पुन्हा क्वारांटाईन; कुटुंबातील सदस्य आणि कर्मचारीही कोरोनाबाधित

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Narendra ModiSanjay Raut
loading image
go to top