विद्यापीठाच्या परीक्षांसाठी आता ‘क्लस्टर’ पॅटर्न; प्रश्नपत्रिका सेटिंग, उत्तरपत्रिका तपासणी महाविद्यालयांकडेच

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने फार्मसी, आर्किटेक्चर, लॉ, बीए-एमएड, अभियांत्रिकी, एमबीए- एमसीए या अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी क्लस्टर पॅटर्न सुरु केला आहे.
परीक्षा
परीक्षाsakal
Updated on

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने फार्मसी, आर्किटेक्चर, लॉ, बीए-एमएड, अभियांत्रिकी, एमबीए- एमसीए या अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी क्लस्टर पॅटर्न सुरु केला आहे. राज्यातील सर्वच अकृषिक विद्यापीठांसाठी हा पॅटर्न प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यातून विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर परीक्षा सतत पुढे ढकलणे, निकालास विलंब होणे, अशा गोष्टी टळणार आहेत.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आदेशानुसार विद्यापीठांच्या शैक्षणिक वर्षाची सुरवात १ ऑगस्टपासून होणार आहे. तत्पूर्वी, २०२२-२३ या वर्षातील शेवटच्या सत्राची परीक्षा १९ जूनपासून घेतली जाणार आहे. २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून पहिल्या टप्प्यात विद्यापीठातील कॅम्पसमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे.

जुलै २०२३ ते जानेवारी २०२४ या काळात सर्वच महाविद्यालयांनी क्लस्टर तयार करून २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठाशी संलग्नित सर्वच महाविद्यालयांमध्ये ते धोरण लागू होईल. परीक्षा घेणे, उत्तरपत्रिका तपासणे, परीक्षा केंद्रे निश्चित करणे या विद्यापीठांकडील जबाबदाऱ्यांचे आता विकेंद्रीकरण केले जाणार आहे. त्या त्या अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांनाच परीक्षांचे वेळापत्रक ठरवणे, परीक्षा घेणे व उत्तरपत्रिका तपासणी करणे, या जबाबदाऱ्या दिल्या जाणार आहेत. क्लस्टर पॅटर्नमधून विद्यार्थ्यांना परीक्षा व निकालाची श्वाश्वती देण्याचा प्रयत्न आहे.

‘क्लस्टर’ पॅटर्न नेमका काय आहे?

विद्यापीठाने फार्मसी, आर्किटेक्चर, लॉ, बीए-एमएड, अभियांत्रिकी, एमबीए- एमसीए या महाविद्यालयांचे क्लस्टर तयार केले आहेत. प्रत्येक अभ्यासक्रमाच्या एकूण महाविद्यालयातील एका महाविद्यालयाकडे जबाबदारी देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या त्या अभ्यासक्रमाची परीक्षा पार पाडली जाणार आहे. प्रश्नपत्रिका तयार करणे, परीक्षा केंद्रांची निवड, वेळापत्रक ठरविणे, पेपर तपासणी, या जबाबदाऱ्या त्या महाविद्यालयांकडेच असतील. विद्यापीठाचा त्यावर वॉच राहील. उत्तरपत्रिका विद्यापीठाकडून पुरविल्या जातील. पेपर तपासणीनंतर विद्यार्थ्यांचे गुण विद्यापीठाला कळवायचे, निकाल विद्यापीठ लावणार, असा हा पॅटर्न आहे.

‘क्लस्टर’ पॅटर्नमुळे विद्यार्थ्यांची मिळणार चिंता

विद्यापीठाने वेळापत्रक निश्चित केल्यावर बहुतेक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून अभ्यासक्रम अपूर्ण आहे, परीक्षेसाठी आणखी वेळ द्यावा, अशी मागणी होते. अशावेळी वेळापत्रकात बदल करावा लागतो. दुसरीकडे विद्यापीठाकडे पेपर तपासणीसाठी उपलब्ध प्राध्यापकांची परिपूर्ण माहिती नसल्याने निकालास देखील विलंब होतो. यामुळे परीक्षा विभाग तथा विद्यापीठाची नाहक बदनामी होते. विद्यार्थ्यांमध्ये देखील संभ्रम निर्माण होतो. आता क्लस्टर पॅटर्नमुळे असे प्रसंग उद्‌भवणार नाहीत. त्या त्या महाविद्यालयांना किती अभ्यासक्रम शिकवून झाला किंवा किती राहिला, याची माहिती असल्याने वेळापत्रक अचूक तयार होईल आणि निकालही वेळेत लागतील.

परीक्षा अन्‌ निकालाचे प्रश्न वेळेत निकाली निघतील

परीक्षेचे वेळापत्रक एकदाच आणि तेही अंतिम असावे, निकाल वेळेत लागावेत, या हेतूने आमच्या विद्यापीठाने व्यावसायिक अभ्यासक्रमांचे क्लस्टर तयार केले आहे. त्या त्या अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांद्वारे परीक्षा व पेपर तपासणी करून घेतली जाणार आहे. हा पॅटर्न राज्यभरातील अकृषिक विद्यापीठांसाठी प्रास्तावित आहे.

- डॉ. रजनीश कामत, कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.