मुख्यमंत्र्यांकडून मुस्लीम बांधवासाठी ईदची खास भेट; प्रशासनाला दिले 'हे' निर्देश

मुख्यमंत्र्यांकडून मुस्लीम बांधवासाठी ईदची खास भेट; प्रशासनाला दिले 'हे' निर्देश

मुंबई : येणारी बकरी ईद सर्वांनी सलोख्याने साजरी करावी. मुंबई महापालिका प्रशासनाने देवनार पशुवधगृहात आवश्यक सोयी-सुविधा पुरवाव्यात. तसेच पोलिस, वाहतूक आदी विभागांनीही आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करून सर्व समाजाच्या एकत्रीत सहभागातून हा सण दरवर्षीप्रमाणे शांततेत साजरा होईल असे नियोजन करावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संबंधीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या. 

सह्याद्री अतिथीगृह येथे आज यासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. देवनार पशुवधगृह येथे बकरी ईद काळात करण्यात येणाऱ्या विविध सोयी-सुविधांचे यावेळी मुंबई महापालिकेमार्फत सादरीकरण करण्यात आले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात मागील पाच वर्षात विविध सण-उत्सव शांततेत साजरे करण्यात आले. सर्वच राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्या सहभागातून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात आपण यशस्वी झालो आहोत. यापुढील काळातही सर्वांच्या एकत्रीत सहभागातून विविध सण उत्सव शांततेत साजरे केले जातील, असेही ते म्हणाले.

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर देवनार पशुवधगृह येथे व्यापारी तसेच जनतेसाठी पाणी, वीज, सुरक्षा आदी आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा पुरविण्यात याव्यात, अशा सूचना त्यांनी यावेळी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या. याशिवाय या ठिकाणी तात्पुरती पोलीस चौकी सुरु करणे, वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत आरोग्य सेवा कक्ष सुरु करणे, हेल्पलाईन सुरु करणे आदीबाबतही कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. मुस्लिम समाज बांधवांना हा सण शांततेत आणि आनंदाने साजरा करता येईल यादृष्टीने प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असे त्यांनी यावेळी सांगितले.

हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरुंची संख्या यंदा अधिक आहे. मुंबई तसेच नागपूर विमानतळावर हज समितीमार्फत जाणाऱ्या यात्रेकरुंना विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येत आहेत. मात्र खासगी टूर ऑपरेटरद्वारे प्रवास करणाऱ्या हज यात्रेकरुंना सुविधा मिळत नाहीत, असा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. त्याची दखल घेत खासगी टूर ऑपरेटरद्वारे हज यात्रेस जाणाऱ्या हज यात्रेकरुंनाही सर्व सोयी-सुविधा देण्याबाबत हज समितीस निर्देश देण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बकरी ईदच्या नियोजनासाठी प्रशासनासमवेत बैठक आयोजित करुन नियोजन केल्याबद्दल यावेळी उपस्थित आमदार, विविध कुरेशी आणि खाटीक समाजाचे प्रतिनिधी यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. मुख्यमंत्र्यांनी सर्वांना ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या.

यावेळी पदूम मंत्री महादेव जानकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे, शिक्षण मंत्री अॅड. आशिष शेलार, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, माजी मंत्री मोहम्मद आरिफ (नसीम) खान, अनिस अहमद, आमदार अमीन पटेल, अबू असीम आझमी, वारीस पठाण, अस्लम शेख, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष हैदर आझम, उर्दू अकादमीचे अध्यक्ष डॉ. अहमद राणा, मुख्य सचिव अजोय मेहता, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजयकुमार, पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, मुंबई महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी, परिवहन विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे, कुरेश जमातीचे अध्यक्ष कुलरेझ कुरेश यांच्यासह विविध कुरेशी तसेच खाटीक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com