'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील, क्षीरसागर यांना स्थान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जून 2019

निष्क्रिय मंत्र्यांवर गंडांतर 
जुन्या मंत्रिमंडळातील निष्क्रिय मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे. ताडदेव येथील एमपी मिल कंपाउंड झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात लोकायुक्तांनी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्यावर तोशेरे ओढले आहेत. त्यामुळे महेता यांचा राजीनामा घेऊन त्यांच्या जागी आशीष शेलार यांना संधी देण्यात आली. महेतांनी राजीनामा दिला, तर मुंबईतील गुजराती भाषिक चेहरा म्हणून योगेश सागर यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली. राजकुमार बडोले, प्रकाश महेता, दिलीप कांबळे, प्रवीण पोटे, अंबरीश आत्राम, विष्णू सावरा यांनी राजीनामे दिले.

मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली असताना गेल्या पावणेपाच वर्षांपासून रखडलेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर आज (ता. 16) मुहूर्त मिळाला. राजकीय लाभाचा विचार करून पक्षांतरे करणाऱ्या आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे देण्यात आले असून विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांना भाजपच्या कोट्यातून, तर जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेनेकडून मंत्रिपद देण्यात आले. विस्तारात विखे पाटील यांनी पहिली शपथ घेतली. 

याशिवाय मुंबईतील ऍड. आशीष शेलार यांना संधी देण्यात आली. रिपब्लिकन पक्षाकडून अविनाश महातेकर यांच्यासह तेरा जणांनी मंत्री आणि राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.  राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज सकाळी अकरा वाजता नव्या मंत्र्यांना शपथ दिली. शिवसेना-भाजपचे मिळून एकूण 13 नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. विधानसभा निवडणुकीआधी होणारा हा शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार आहे. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामाजिक आणि प्रादेशिक समतोल साधत मंत्र्यांची नावे निश्‍चित केली. 

भाजपकडून विदर्भातील डॉ. अनिल बोंडे, डॉ. संजय कुटे, औरंगाबाद येथील अतुल सावे, सांगली जिल्ह्यातील सुरेश खाडे यांना मंत्री म्हणून संधी देण्यात आली. तर शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर, विधान परिषद सदस्य तानाजी सावंत यांना शपथ देण्यात आली. 

निष्क्रिय मंत्र्यांवर गंडांतर 
जुन्या मंत्रिमंडळातील निष्क्रिय मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे. ताडदेव येथील एमपी मिल कंपाउंड झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात लोकायुक्तांनी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्यावर तोशेरे ओढले आहेत. त्यामुळे महेता यांचा राजीनामा घेऊन त्यांच्या जागी आशीष शेलार यांना संधी देण्यात आली. महेतांनी राजीनामा दिला, तर मुंबईतील गुजराती भाषिक चेहरा म्हणून योगेश सागर यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली. राजकुमार बडोले, प्रकाश महेता, दिलीप कांबळे, प्रवीण पोटे, अंबरीश आत्राम, विष्णू सावरा यांनी राजीनामे दिले.

प्रविण पोटे व मंत्रीपद..! 
प्रविण पोटे हे सुरूवातीला रामदास आठवलेंच्या कोट्यातून मंत्री होते या शंकेला आज मुर्त स्वरूप मिळाले आहे. रिपब्लिकन पक्षाकडे एक राज्यमंत्री पद देण्याचे महायुतीच्या चर्चेत ठरले होते. प्रविण पोटे हे विधानपरिषदेवर अपक्ष आमदार होते. त्यांनी एका वजनदार भाजप नेत्याला मंत्रीमंडळ प्रवेशासाठी गळ घातली होती. याच नेत्याने त्यांना रामदास आठवले यांच्याशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला अन त्यांचे मंत्रीपद कायम केले होते. आता विधानसभेच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडी दलित मतदारांमधे जोरात आघाडी घेत असताना दलित चळवळीतला प्रामाणिक व एकनिष्ठ चेहरा देण्याशिवाय पर्याय नसल्याने आठवले यांनी महातेकर याचे नाव पुढे केल्याची चर्चा आहे. प्रविण पोटे यांना छुप्या पध्दतीने रिपाईच्या कोट्यातून दिलेले  राज्यमंत्री पद त्यामुळेच काढून घेतल्याची राजकिय चर्चा रंगली आहे.

मंत्री
राधाकृष्ण विखे पाटील
जयदत्त क्षीरसागर
आशीष शेलार
संजय कुटे
सुरेश खाडे
डॉ. अनिल बोंडे
डॉ. अशोक उईके
डॉ. तानाजी सावंत

राज्यमंत्री
योगेश सागर
अविनाश महातेकर
संजय (बाळा) भेगडे
परिणय फुके
अतुल सावे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Devendra Fadnavis cabinet expansion in Maharashtra