मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषी समितीच्या निमंत्रकपदी

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 1 जुलै 2019

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि कृषीक्षेत्रात आमूलाग्र बदल करणे या मुद्द्यांचा अभ्यास करून मुख्यमंत्र्यांची समिती दोन महिन्यांत अहवाल सादर करेल.

नवी दिल्ली : कृषी क्षेत्रातील बदलांसाठी सहा मुख्यमंत्र्यांचा समावेश असलेली उच्चस्तरीय समितीची नियुक्ती आज (सोमवार) करण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या समितीचे निमंत्रक असतील; तर कर्नाटक, हरियाना, अरुणाचल प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांचे मुख्यमंत्री त्याचप्रमाणे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर हे सदस्य असतील. तसेच नीती आयोगाचे सदस्य रमेश चांद सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि कृषीक्षेत्रात आमूलाग्र बदल करणे या मुद्द्यांचा अभ्यास करून मुख्यमंत्र्यांची समिती दोन महिन्यांत अहवाल सादर करेल. मागील महिन्यात नीती आयोगाच्या प्रशासकीय परिषदेची बैठक झाली होती. त्यात अशाप्रकारे उच्चस्तरीय समिती नेमण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली होती. 

सध्याच्या कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्याऐवजी शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक सुलभतेने करण्याची मुभा देणारा कृषी उत्पन्न तसेच पाळीव पशुविपणन प्रोत्साहन कायदा आणणे, कृषी निर्यातवृद्धी, अन्नप्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन यावर मुख्यमंत्र्यांची समिती सर्व राज्यांशी चर्चा करेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Devendra Fadnavis elected as the convenor of the Agriculture Committee by NITI Aayog