फडणवीसांच्या चाळीस सभा अन्‌ 32 विजय 

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

मुंबई : अत्यंत प्रतिकूल वातावरणात लढलेल्या निवडणुका अशी सर्वदूर चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरपालिकांच्या पहिल्या टप्प्यात भाजपला ऐतिहासिक यश मिळवून दिले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दररोज प्रचारसभांचा धुराळा उडवत 40 ठिकाणी त्यांनी घेतलेल्या सभांपैकी 32 ठिकाणी निर्णायक यश मिळवत 'मोदींचे आवडते' अशी ओळख असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी आपण लोकनेता असल्याचे सिद्ध केल्याचे मानले जाते. 

प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना एकत्र बोलावून फडणवीस यांनी दोन महिन्यांपूर्वी दुपारी एकपासून रात्री एकपर्यंत 12 तासांची प्रदीर्घ बैठक घेतली. या बैठकीत निवडणुकांत यश मिळाले नाही, तर पद गमवावे लागेल, असा निरोप मला दिल्लीहून आलेला आहे, त्याच आधारावर जो मंत्री यश खेचून आणणार नाही, त्याला लाल दिवा सोडावा लागेल, असे फडणवीस यांनी सांगितले.

मार्च महिन्यात मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याची भाषा करत आम्हाला कामाला लावले, असे एका ज्येष्ठ मंत्र्याने आज सांगितले. प्रत्येक मंत्र्यांना तीन-तीन जिल्हे वाटून देत कामाला लागण्याचा आदेश दिला गेला. यानंतर महाराष्ट्रात भाजपने सर्वत्र प्रचाराची राळ उडवली. दौऱ्यावरून परत येऊन दररोज मध्यरात्री उशिरापर्यंत फडणवीस वेगवेगळे समीकरण तयार करून ते प्रत्यक्षात येण्याचे डावपेच रचत असत.

त्याचा परिणाम म्हणून आज पहिल्या टप्प्यात भाजपला निर्णायक यश मिळाले आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र अशा बालेकिल्ल्यांबरोबरच पश्‍चिम महाराष्ट्रात, तसेच कोकणातील काही भागांत भाजपने प्रथमच स्थानिक राजकारणात निर्णायक आघाडी मिळवली आहे.

मंत्रिमंडळातील क्रमांक दोनचे सहकारी चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नोंदवलेली कामगिरी अभूतपूर्व आहे. सांगली, इस्लामपूर, कऱ्हाड, मालवण अशा पूर्णतः अनुकूल ठिकाणी भाजप आणि शिवसेनेने यश मिळवले. एबी फॉर्म वाटल्यावर शिवसेनेला न दुखावता युतीला होकार देण्याची खेळी, तसेच सर्व सहकाऱ्यांना विजय आवश्‍यक असल्याचे सांगत कामगिरीचा धरलेला आग्रह, यामुळे भाजपला यश मिळाले आहे.

मराठवाड्यात मात्र भाजपला काहीशी माघार पत्करावी लागली. परळी येथे भाऊ धनंजयसमोर मंत्री पंकजा अयशस्वी ठरल्या असल्या, तरी ती जागा भाजपला कधीच मिळाली नव्हती. जालन्यात मुस्लिमबहुल लोकसंख्येमुळे दानवे यांना, तर परतूर येथे बबनराव लोणीकर यांच्या पत्नीला पराभूत व्हावे लागणे मात्र भाजपसाठी दुःखद ठरले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com