
CM शिंदेंनी फोन केला तरी बोम्मईंचा आडमुठेपणा कायम, सीमावादावर ट्विट
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा चांगलाच पेटला आहे. सीमालगत भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाद दिसून येत आहेत. यामुळे बस सेवाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागात तणावग्रस्त वातावरण निर्माण झालं आहे. महाराष्ट्रातील एसटी बसला आणि गाड्यांवर कर्नाटकाच्या सीमेवर हल्ले करण्यात आले तर, दुसरीकडे महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात कर्नाटकातील बसेसना काळं फासण्यात आलं त्यावर जय महाराष्ट्र असं लिहण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यांमधील वाढता तणाव पाहता, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली आहे.
दरम्यान यासंबधी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. ट्विटमध्ये बोम्मई म्हणतात की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी माझ्याशी फोनवरून चर्चा केली आहे, दोन्ही राज्यामध्ये शांतता, कायदा आणि सुव्यवस्था राखली पाहिजे यावर आम्ही दोघांचेही एकमत झाले आहे. दोन्ही राज्यातील लोकांमध्ये चांगले संबंध आहेत. मात्र, कर्नाटक सीमेबाबत आमच्या भूमिकेमध्ये कोणताही बदल झालेला नाही. कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर कायदेशीर लढाई सुप्रीम कोर्टात सुरू राहील, असेही शेवटी बोम्मई म्हणालेत.
हे ही वाचा : शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....
तर याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी फोनवरुन चर्चा करून राज्यातील बसेसला लक्ष्य केल्याबद्दल चर्चा केली होती. तर विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने हा प्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी देखील राज्य सरकारला 24 तासांचा अल्टीमेटम दिला होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवर चर्चा केल्यानंतरही आपण आपल्या आडमुठेपणावर ठाम असल्याचे बोम्मई म्हणालेत.
हेही वाचा: Uddhav Thackeray: 'जमत नसेल तर सांगावं, जबाबदारी घ्यायला तयार!' ठाकरेंची डरकाळी