esakal | राज्याला केंद्राकडून रेमडेसिव्हिरची मदत; ठाकरेंनी मानले मोदींचे आभार

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray and PM Modi

केंद्रीय आरोग्य खात्याच्या औषधी विभागाचे सहसचिव नवदीप रिनवा यांचे यासंदर्भातील पत्र राज्य सरकारला मिळाले आहे.

राज्याला केंद्राकडून रेमडेसिव्हिरची मदत; ठाकरेंनी मानले मोदींचे आभार

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

Corona Updates : मुंबई : राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला होता. या समस्येकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते. तसेच रेमडेसिव्हिरचा पुरवठा करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्राद्वारे विनंती केली होती. याची दखल घेत केंद्र सरकारने राज्यासाठी ३० एप्रिलपर्यंत ४ लाख ३५ हजार व्हायल्सचा पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांनी याकरिता पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. हा पुरवठा पूर्वी २ लाख ६९ हजार व्हायल्स एवढा होता, त्यात आता ४ लाख ३५ हजारपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

हेही वाचा: नाकावाटे दिली जाणार लस, जाणून घ्या भारत बायोटेकच्या लसीबद्दल

केंद्रीय आरोग्य खात्याच्या औषधी विभागाचे सहसचिव नवदीप रिनवा यांचे यासंदर्भातील पत्र राज्य सरकारला मिळाले आहे. यात म्हटले आहे की, २१ एप्रिल ते ३१ एप्रिलपर्यंतचा हा पुरवठा असणार आहे. देशभरातील राज्यांच्या मागणीप्रमाणे १६ लाख रेमडेसिव्हिर व्हायल्स केंद्राकडून पुरविण्यात येणार असून सात परवानाधारक उत्पादक कंपन्यांना प्राधान्याने हा पुरवठा करण्यास सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू, देशात आढळले साडेतीन लाख रुग्ण

दरम्यान, गेल्या आठवड्यात अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनीही रेमडेसिव्हिरच्या कमतरतेकडे लक्ष वेधले होते. महाराष्ट्राला दररोज ६० हजार डोसची आवश्यकता आहे. पण सध्या १८ ते २० हजार डोसची कमतरता जाणवत आहे. परिणामी, रुग्णसंख्या वाढत चालली आहे, असे शिंगणे यांनी सांगितले.

दुसरीकडे दिवसभरातील मागणी लक्षात घेता राज्यात रेमडेसिव्हिरचा साठा पुरेसा आहे, पण त्याचे वितरण करणे हे आव्हानात्मक असल्याने ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हिरचा वापर डॉक्टरांनी योग्य प्रकारे करावा, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले होते.

हेही वाचा: बॉम्बस्फोट, आरडीएक्स आणि पवार!

दरम्यान, महाराष्ट्रात शनिवारी दिवसभरात ६७,१६० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले तर ६७६ रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यूंचा आकडा मोठा असल्याने चिंतेचं वातावरण असलं तरी दुसरीकडे ६३,८१८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८२.०२% झाले आहे. राज्यात सध्या ६,९४,४८० अॅक्टिव्ह रुग्ण असून एकूण ६३,९२८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.