शिवसेनेला नडणाऱ्यांना जशास तसं उत्तर द्या; उद्धव ठाकरेंचे शिवसेना प्रवक्त्यांना आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रवक्त्यांसोबत बैठक सुरु केलीय.

शिवसेनेला नडणाऱ्यांना जशास तसं उत्तर द्या : उद्धव ठाकरे

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली. या भेटीतील चर्चेचा नेमका तपशील समजू शकला नाही. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची औरंगाबादची सभा, भोंग्यांचा मुद्दा, राज्यातील कायदा सुव्यवस्था आणि नवनीत राणा यांना झालेली अटक आदी मुद्द्यांवर या भेटीत चर्चा झाल्याचं कळतंय.

या भेटीनंतर लगेचच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रवक्त्यांसोबत बैठक सुरु केलीय. या बैठकीला शिवसेना नेते संजय राऊत, विनायक राऊत, अरविंद सावंत यांच्यासह मुंबई व महाराष्ट्रातील सर्व प्रवक्ते उपस्थित असल्याचं कळतंय. दरम्यान, या तापलेल्या राजकीय वातावरणात शिवसेनेला नडणाऱ्यांना जशास तसं उत्तर देण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आल्याचंही समजतंय. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रवक्त्यांना जशास तसं उत्तर देण्यास सांगितलं असून राज्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत.

शिवसेनेला हिंदुत्वावरून डिवचणाऱ्या भाजपा आणि मनसेचे हिंदुत्व किती बोगस आहे हे जनतेला दाखवून द्या, भाजपा, मनसेवर तुटून पडा, असे आदेशच ठाकरे यांनी आज कार्यकर्त्यांना दिले आहेत. बाबरी मशीद पाडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते, असा सवालही राज यांच्या बदललेल्या भूमिकेवर उपस्थित केलाय. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबतच्या आजच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी कधी नव्हे तो थेट राज ठाकरेंवर टीका केलीय. ठाकरे यांनी वर्षा या निवासस्थानी शिवसेनेच्या प्रवक्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी जशास तसे उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.